गेल्या दीड वर्षांत शहरातील रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणांहून जप्त केलेल्या बेवारस वाहनांच्या भंगारविक्रीतून महापालिकेला तब्बल एक कोटी रुपयांचा महसूल मिळाला. याचा काळात जप्त केलेल्या वाहनांना सोडवून घेण्यासाठी आलेल्यांकडून ४६ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यांवर अनेकदा वाहने सोडून दिली जातात. या वाहनांमुळे रस्त्यावरील वाहतुकीलाही अडथळा येतो. तसेच या वाहनांच्या टपावर किंवा आत पाणी साचून त्यात डेंग्यू-मलेरियाची साथ पसरवणाऱ्या डासांची उत्पत्ती होत असल्याचेही आढळून आले आहे. पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून ही वाहने जप्त करण्यात येतात.

त्यानुसार जानेवारी २०१६ ते जून २०१७ या अठरा महिन्यांत पालिकेने ३ हजार ४१८ वाहने शहरभरातून जप्त केली. यातील केवळ २० टक्के वाहनांनाच मालकी हक्क दाखवून सोडवून घेण्यात आले. रस्त्यावर वाहन उभे केल्यामुळे या ६१२ वाहनांच्या दंडापोटी ४६ लाख २६ हजार रुपये वसूल करण्यात आले.

उर्वरित ८० टक्के म्हणजे २ हजार ७४७ वाहने सोडवून घेण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. यानुसार २ हजार ७४७ वाहनांचा नुकताच लिलाव करण्यात आला. तर उर्वरित ५९ वाहने ही विविध पोलीस प्रकरणांशी संबंधित असल्याने लिलावातून वगळण्यात आली.

दीड वर्षांच्या कालावधीत पालिकेने जप्त केलेल्या वाहनांमध्ये २ हजार २१७ दुचाकी, ३०० तीनचाकी आणि ९०१ चारचाकी वाहनांचा समावेश होता. यापैकी सोडवून नेण्यात आलेल्या ६१२ वाहनांमध्ये १९३ दुचाकी, ५० तीनचाकी; तर ३६९ चारचाकी वाहनांचा समावेश होता. लिलाव करण्यात आलेल्या २ हजार ७४७ वाहनांचे वजन हे साधारणपणे ५ लाख ९५ हजार १२० किलो एवढे होते. हा लिलाव ‘ऑनलाइन लिलाव’ पद्धतीने आयोजित करण्यात आला होता. यानुसार ९५ लाख ९६ हजार रुपये एवढय़ा अंतिम बोलीला या वाहनांची विक्री झाल्याची माहिती अतिक्रमण निर्मूलन खात्याचे साहाय्यक आयुक्त विश्वास शंकरवार यांनी दिली.