News Flash

बेघर, भिक्षेकऱ्यांच्या भोजनासाठी पालिकेचा पुढाकार

दोन कोटी खर्च करून सहा लाख खाद्यपाकिटांचे वाटप

दोन कोटी खर्च करून सहा लाख खाद्यपाकिटांचे वाटप

मुंबई : करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने लागू केलेल्या कडक निर्बंधांचा आधार घेत पुन्हा एकदा महापालिकेने मुंबईमधील बेघर आणि भिकाऱ्यांना अन्नपदार्थ पाकिटांचे वितरण करण्यासाठी सुमारे दोन कोटी २० लाख रुपये खर्च करण्याचा घाट घातला आहे. तब्बल सहा लाख अन्नपदार्थ पाकिटांच्या पुरवठय़ासाठी पालिकेने निविदा जारी केल्या आहेत. दर दिवशी दुपार आणि रात्री मिळून २० हजार अन्नपदार्थ पाकिटांचे वाटप करण्यात येणार आहे. मात्र ठरावीक पुरवठादारांना डोळ्यासमोर निविदा काढण्यात आल्याचा आरोप पालिका वर्तुळात होऊ लागला आहे.

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडय़ापासून मुंबईत पुन्हा करोनाच्या संसर्गाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले. अत्यावश्यक वस्तू वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. तसेच सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल प्रवासास मनाई करण्यात आली आहे. केवळ सकाळी ८ ते ११ या कालावधीत बाजारपेठा सुरू ठेवण्यात येत आहेत. निर्बंध लागू होताच पहिल्या शनिवार-रविवारी बेघर आणि भिकाऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी पालिकेच्या नियोजन आणि करनिर्धारण व संकलन विभागातील कर्मचाऱ्यांकडून ४० रुपये वर्गणी गोळा करण्यात आली होती.

यातील २० रुपये बिस्कीट पुडा, तर २० रुपये केळ्यांसाठी खर्च करण्यात आल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. त्यानंतर पालिका दप्तरी नोंदणी असलेल्या भिकाऱ्यांना अन्नपदार्थाचा पुरवठा करण्यासाठी काही सामाजिक संस्थांना आवाहन करण्यात आले होते. तीन-चार सामाजिक संस्थांनी अन्नपदार्थ पाकिटांचा पुरवठा करण्याची तयारीही दर्शविली होती. त्याचे वाटप करण्याची जबाबदारी संस्थांच्या प्रतिनिधींसोबत करनिर्धारण व संकलन विभागातील कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली होती.

आता पालिकेने सात परिमंडळातील बेघर आणि भिकाऱ्यांना सहा लाख अन्नपाकिटांचा पुरवठा करण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. प्रतिअन्नपदार्थ पाकीट ३५ रुपये दराने खरेदी करण्यात येणार आहे. वस्तू आणि सेवा करासह यासाठी दोन कोटी २० लाख ५० हजार रुपये खर्च पालिकेला अपेक्षित आहे. या अन्नपदार्थ पाकिटांचा ३० दिवस पुरवठा करण्यात येणार आहे. परिमंडळ १ मध्ये म्हणजे कुलाब्यापासून भायखळ्यापर्यंतच्या पाच विभाग कार्यालयांच्या हद्दीत सर्वाधिक ६१ लाख ७६ हजार १०० रुपये खर्च करून एक लाख ७६ हजार ४६० अन्नपदार्थ पाकिटांचा पुरवठा करण्यात येणार आहे.

अन्नपदार्थ पुरवठय़ासाठी मागविलेल्या निविदा

परिमंडळ       पाकिटांची संख्या  खर्च (रु.)

परिमंडळ १     १,७६,४६०       ६१,७६,१००

परिमंडळ २     ८८,३८०       ३०,९३,३००

परिमंडळ ३     १,२०,३००       ४२,१०,५००

परिमंडळ ४     ६२,७००       २१,९४,५००

परिमंडळ ५     ७८,३००       २७,४०,५००

परिमंडळ ६     ३०,३००       १०,६०,५००

परिमंडळ ७     ४३,५६०       १५,२४,६००

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 1:10 am

Web Title: bmc distribute food packets to homeless beggars in lockdown zws 70
Next Stories
1 संक्रमण शिबिरातील भाडेकरूंना ‘म्हाडा’चे ‘अभय’
2 रस्ता रुंदीकरणासाठी आठ झाडांची कत्तल
3 जुलै-ऑगस्टमध्ये तिसरी लाट येण्याची भीती
Just Now!
X