गणेश विसर्जनावेळी जेवण देण्यास पालिकेचा नकार
गेली अनेक वर्षे गणेश विसर्जनाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कोणताही मोबदला न घेता समुद्रकिनाऱ्यालगत पाण्यात सज्ज राहणाऱ्या खासगी जीवरक्षकांना पालिका अधिकाऱ्यांनी यंदा चहा-नाश्ता आणि जेवण देण्यास नकार दिला आहे. परिणामी, या संकटमोचक जीवरक्षकांना दिवसभर कडकडीत उपवास झाला. अखेर स्थानिक पोलीस या संकटमोचकांच्या मदतीला धावले आणि पोलिसांनी जेवण उपलब्ध केल्यानंतर जीवरक्षकांचा उपास सुटला.
गेली अनेक वर्षे ‘जल सुरक्षा दल’ आणि ‘एच २ ओ मरिन टेक’ या खासगी संस्थांमार्फत विसर्जनाच्या वेळी जीवरक्षक उपलब्ध केले जातात. शिवाजी पार्क चौपाटीवर १५० व ६०, तर गिरगाव चौपाटीवर २५ व ६० असे जीवरक्षक तैनात केले जातात. गेल्या वर्षीपर्यंत या संकटमोचकांना पालिकेतर्फे जेवण उपलब्ध करण्यात येत होते. मात्र यंदा जेवणासाठी कोणतीही तरतूद करण्यात आली नसल्याचे कारण पुढे करीत नकार दिला.
दीड दिवस, पाचवा दिवस आणि गौरी-गणपतीच्या विसर्जनाच्या वेळी पालिकेने त्यांना चहा-नाश्ता, जेवण उपलब्ध केले नाही. जेवण येण्यास विलंब झाला असेल असे वाटल्याने जीवरक्षकांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. संध्याकाळी उपाशीपोटी पाण्यामध्ये उभे राहणे अवघड बनल्याने ते किनाऱ्यावर आले. चौकशी केल्यानंतर पालिकेकडून जेवण मिळणार नसल्याचे त्यांना समजले. अखेर स्थानिक पोलिसांनी जेवणाची व्यवस्था केली. पालिकेने हात आखडता घेतला असला तरी अनंत चतुर्दशीला चौपाटय़ांवर विसर्जनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता या दिवशी विनामूल्य सेवा देण्याचा निर्धार या संकटमोचकांनी केला आहे.
*****
अनेक वर्षे आम्ही विनामूल्य सेवा देऊनही आमच्याकडे दुर्लक्ष केले जाते. जीवरक्षक संकटमोचक बनून विनामूल्य सेवा देत असतील, तर त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात पालिकेने हात का आखडता घ्यावा, हे समजू शकलेले नाही.
-राजेश राणे, ‘एच २ ओ मरिन टेक’
*****
आमचे जीवरक्षक पाण्यात सतर्क असतात. काही तरुण हुल्लडबाजी करतात. अशा वेळी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी आम्ही सज्ज राहतो. पण विनामूल्य सेवा देऊनही पालिकेला आमच्या जीवरक्षकांची कदर नाही.
– सूरज वालावलकर, जल सुरक्षा दल
*****
विसर्जन सोहळ्यासाठी पालिकेने समुद्रकिनाऱ्यावर बोटीसह कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. त्यांची व्यवस्था कंत्राटदारातर्फे केली जाते.
– देवीदास क्षीरसागर, सहाय्यक आयुक्त, ‘डी’ विभाग
*****
समन्वय समितीने जीवरक्षकांना जेवण द्यावे असे अधिकारी सांगत आहेत. जीवरक्षकांना साधे चहा-पाणी, जेवण न देण्याइतकी पालिका कंगाल झाली आहे का?
-अॅड. नरेश दहिबावकर, अध्यक्ष, सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 12, 2016 1:38 am