पुढील वर्षी होणा-या मुंबई महापालिका निवडणुकीचा बिगूल गुरुवारी वाजला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून यात ४५ उमेदवारांचा समावेश आहे. उमेदवारी देताना राष्ट्रवादी काँग्रेसने डॉक्टर, वकिलांना प्राधान्य दिल्याचे दिसत असून याद्वारे राष्ट्रवादीने मुंबईतील सुशिक्षित मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत तूर्तास तरी काँग्रेससोबत आघाडी करणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

गुरुवारी दुपारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन आहिर आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यादीत डॉक्टर, वकील आणि उच्चशिक्षित उमेदवारांना संधी दिल्याचे सचिन आहिर यांनी सांगितले. यासोबतच विद्यमान नगरसेवकांनाही संधी दिल्याचे त्यांनी सांगितले. पुढील वर्षी फेब्रवुरीमध्ये महापालिका निवडणूक होण्याची शक्यता आहे. उमेदवारांची यादी जाहीर करुन निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस व राष्ट्रवादीने भविष्यात एकत्र आले पाहिजे, अशी दोन्ही पक्षातील नेत्यांची भावना झाली. भाजप-शिवसेना युतीला धक्का देण्याकरिता दोन्ही काँग्रेसने एकत्र यावे, अशी चर्चाही सुरू झाली. काँग्रेसच्या नेतृत्वाने ताठर भूमिका सोडावी अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये शक्य असेल तेथे आघाडी व्हावी, असे प्रयत्न सुरू झाले आहेत. पण गुरुवारी राष्ट्रवादीने पहिली यादी जाहीर करतानाच तूर्तास आघाडी नाही असे वक्तव्य केले आहे.