मुंबई महापालिका निवडणुकीला अवकाश असला, तरी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जुनी आश्वासनांवरही बोट ठेवलं जात आहे. शिवसेनेनं दिलेल्या अशाच एका आश्वासनावर भाजपानं बोट ठेवलं आहे. भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी जुन्या आश्वासनाची आठवण करून देत ‘जे बाणेदार वचन दिलं, त्याच काय झालं?,” असा सवाल केला आहे.

मुंबई महापालिकेच्या मागील निवडणुकीत शिवसेनेनं मुंबईतील निवासी इमारतींमधील ५०० चौरस फुटांपर्यंत चटई क्षेत्र असलेल्या निवासी सदनिकांचा मालमत्ता कर संपूर्णत: माफ करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. मात्र, मुंबईत ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना संपूर्ण मालमत्ता करमाफीचा शिवसेनेचा निर्णय हवेतच विरला का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आणखी वाचा- ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’; मुंबई जिंकण्यासाठी शिवसेनेची तयारी

भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी यावरूनच शिवसेनेला सवाल केला आहे. “सुटलेला बाण आणि दिलेला वचनाचा शब्द परत घेता येत नाही, असे म्हणतात. मग, मुंबईकरांना 500 चौरस फुटा पर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सूट देण्याचे जे “बाणेदार वचन” दिले त्याचे काय झाले? टाटा,जावई,मुलाला वाटून झाले असतील तर आता आमच्या सामान्य मुंबईकरांची आठवण येऊ द्या!,’ असा टोला शेलारांनी शिवसेनेला लगावला आहे.

आणखी वाचा- सरपंचपदाची बोली बोलायची व बोलीतून निवडून यायचं हा लोकशाहीचा खून – चंद्रकांत पाटील

मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संपूर्ण मालमत्ता करमाफी दिल्यानंतर यंदा मात्र महापालिका प्रशासनाने यू टर्न घेतल्याचं वृत्त समोर आलं होतं. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वसूल न केलेल्या २८५ कोटींच्या मालमत्ता कराची थकबाकी आता वसूल करण्याची तयारी सुरु केली असल्याची माहिती आहे. यंदा मालमत्ता कराअंतर्गत येणाऱ्या १० करांपैकी केवळ सर्वसाधारण कर माफ केला जाणार असून, इतर ९ कर मात्र भरावे लागणार असल्याचं बोललं जात आहे. त्यावरूनच आशिष शेलार यांनी सवाल उपस्थित केला आहे.