पालिका कर्मचाऱ्याला डुलकी लागल्यामुळे वरळीमधील लालबहाद्दूर शास्त्री उद्यानातील मुंबईकरांना पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी ओसंडून वाहू लागली आणि मध्यरात्रीनंतर साखरझोपेत असलेल्या आसपासच्या रहिवाशांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ घबराट पसरली.
वरळीत टेकडीवर असलेल्या पाण्याच्या टाकीमधून काही भागाला पाणीपुरवठा केला जातो. गुरुवारी मध्यरात्रीनंतर ही टाकी ओसंडून वाहू लागली आणि हजारो लिटर पाणी वाया गेले. टेकडीखाली राहणाऱ्या रहिवाशांच्या घरात पाणी शिरले. पाणीपुरवठय़ाच्या वेळांवर लक्ष ठेवण्यासाठी येथे पालिका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र त्याला डुलकी लागल्यामुळे टाकी ओसंडून वाहू लागल्याचे त्याला कळलेच नाही. या ठिकाणी सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आले आहेत. परंतु तेही यावेळी तेथे उपस्थित नव्हते. रहिवाशांनी पोलीस आणि पालिकेच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधाला आणि घटनेची माहिती दिली. त्यानंतर पालिका कर्मचारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. टाकीत होणारा पाणीपुरवठा वेळीच बंद केला नसता, तर टाकी फुटून मोठी दुर्घटना घडली असती.