चर्चा न होताच गटनेत्यांची बैठक आटोपली

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे पालिका कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या बोनसवर चर्चा करण्यासाठी पालिका मुख्यालयातील महापौरांच्या दालनात शनिवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाकडून बोनसबाबत तूर्तास कोणतीच भूमिका घेण्यात न आल्याने या बैठकीत त्यावर चर्चाच झाली नाही. तसेच काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांचे गटनेते बैठकीस गैरहजर असल्याने सत्ताधारी शिवसेना-भाजपनेही या विषयावर चर्चा करणे टाळले. आता पुढील आठवडय़ात प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांमध्ये बोनस प्रश्नावर बोलणी होणार आहेत. परिणामी, पालिका कर्मचाऱ्यांचा बोनस लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.

दिवाळीनिमित्त पालिका कर्मचाऱ्यांना बोनस देण्याबाबत महापौर स्नेहल आंबेकर यांच्या दालनात शनिवारी गटनेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विरोधी पक्षांचे गटनेते अनुपस्थित होते. तसेच दिवाळीला साधारण दोन आठवडे असल्यामुळे या विषयावर पालिका प्रशासनाकडून चर्चा करण्यात आली नाही. विरोधी पक्षांचे गटनेते नसल्यामुळे सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या नेत्यांनीही बोनस विषयावर चर्चा करण्यात रस दाखविला नाही. परिणामी, या विषयावर चर्चा न होताच ही बैठक संपुष्टात आली.

पालिका कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या कृती समितीने यंदा कर्मचाऱ्यांना सरसकट २५ हजार रुपये बोनस द्यावा अशी मागणी केली आहे. तर म्युनिसिपल मजदूर युनियनने कर्मचाऱ्यांना २० हजार रुपये बोनस देण्याचा आग्रह धरला आहे.