पोलीस उपनिरीक्षक सुर्यवंशी यांना विधानभवनात झालेल्या मारहाण प्रकरणानंतर आजी माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांच्या पाठीशी उभे राहिले. मात्र महापालिका अभियंता राजेश राठोड यांना मनसे स्वीकृत नगरसेवक गिरीश धानुरकर याने मारहाण केल्यापासून आजपर्यंत महापालिका आयुक्त अथवा सामाजिक संस्था तसेच काही निवृत्त ‘बोलक्या पोपटां’नी या प्रकाराकडे पाठच फिरविल्याने पालिका अभियंत्यांचे मनोबल खच्ची झाले असून स्वत: राठोड हेही अद्याप मानसिक तणावाखाली असल्याचे अभियंता संघटनेचे म्हणणे आहे.
पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी यांच्यावर आमदारांशी असभ्य संभाषण केल्याचा आरोप होता, पण राजेश राठोड यांनी अशी कोणतेही अरेरावी केली नव्हती, तसेच केवळ अनधिकृत शेडबाबत लेखी तक्रार देण्याची विनंती स्वीकृत नगरसेवक धानुरकर यांना केली होती, असे अभियंत्यांचे म्हणणे आहे. १ ऑगस्ट रोजी धानुरकर यांनी मनसेच्या दादर येथील शाखा क्रमांक १८५मध्ये बोलावून राठोड यांना मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ अटक केली व दुसऱ्या दिवशी धानुरकर व अन्य चौघांची जामिनावर सुटकाही झाली. मात्र ज्या शाखेत ही मारहाण झाल तेथील अनधिृत बांधकामाला नोटीस देण्यास सहाय्यक पालिका आयुक्त उघडे यांनी टाळाटाळ चालवली. प्रसारमाध्यमांनी हा विषय उचलून घरल्यानंतर तसेच आयुक्त कुंटे यांनी नोटीस बजाविण्याचे आदेश दिल्यांतर चार दिवसांनी पालिकेने अनधिकृत शाखेला नोटीस दिली.
अभियंता संघटनेचे राजाध्यक्ष व सचिव सुखदेव काशीद यांनी गिरीश धानुरकर यांच्यावर अपात्रतेच्या कारवाईची मागणी लावून धरली असली तरी अद्यापि आयुक्तांकडून त्याचा ‘अभ्यास’ सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दुर्देवाने महापालिका आयुक्त कुंटे याबाबत उदासीन असून सहाय्यक पालिका आयुक्त अथवा उपायुक्तांना मारहाण झाली असती तर अशी शांतता दिसली असती का, असा आरोप आता अभिंयत्यांकडून करण्यात येत असून अशा परिस्थितीमुळे अभियंत्यांचे मनोबल खच्ची होणारच, असे राजाध्यक्ष म्हणाले. धानुरकर यास धडा शिकविण्यासाठी कनिष्ठ अभियंता राठोड व त्यांच्याकुटुंबांच्या मागे कोणी उभे राहणार आहे की नाही, असा सवाल पालिका वर्तुळात उपस्थित केला जात आहे.