News Flash

खड्डय़ांवरून मनसेची नौटंकी

मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी मंगळवारी सकाळी पालिकेचे उपअभियंते शाह, काकडे आणि सिंग यांना आपल्या कार्यालयात बोलावले होते

| July 24, 2013 02:39 am

पावसाच्या तडाख्यात दादर खड्डय़ात गेल्याने नागरीक हैराण झाले आहेत. ‘मनसे शैली’त नौटंकी करीत पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला चपराक देण्याची ही संधीही मनसेने सोडली नाही़  खड्ड्यांचा जाब विचारण्यासाठी मनसेने पालिकेच्या उपअभियंत्यांना त्यांच्या कार्यालयातच डांबून ठेवले होत़े  ‘खड्डे बुजवा आणि उपअभियंत्यांना घेऊन जा’, असे आव्हान मनसेने प्रशासनाला दिले होते. अखेर पाऊस ओसरताच तात्काळ खड्डे बुजविण्याचे व कंत्राटदारांविरुद्ध कारवाईचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिल्यावर सुमारे सहा तासांच्या ‘बंदीवासा’नंतर उपअभियंत्यांची सुटका करण्यात आली.
पालिका निवडणुकीत दादर गमावणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जिव्हारी लागले होते. बालेकिल्ला पुन्हा मिळविण्यासाठी शिवसेनेने जोरदार हालचाली सुरू केल्या. मात्र पावसाच्या तडाख्यात दादर खड्डेमय होऊ लागले आणि पुन्हा एकदा मनसे सक्रिया झाला.
मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी मंगळवारी सकाळी पालिकेचे उपअभियंते शाह, काकडे आणि सिंग यांना आपल्या कार्यालयात बोलावले होते. गेल्या वर्षी बुजविलेले खड्डे या वर्षी पुन्हा उखडल्याची बाब संदीप देशपांडे यांनी त्यांच्या निदर्शनास आणून कंत्राटदारांवर केलेल्या कारवाईच्या तपशीलाची विचारणा केली. मात्र त्याचे उत्तर उपअभियंत्यांना देता आले नाही. अखेर मनसेचे कार्यकर्ते या तिघांना घेऊन पालिकेच्या जी-उत्तर विभाग कार्यालयात पोहोचले. ‘दादरमधील खड्डे जोपर्यंत भरणार नाही, तोपर्यंत उपअभियंत्यांना सोडणार नाही’, असे आव्हानच संदीप देशपांडे यांनी रस्ते विभागाच्या प्रमुख अभियंत्यांना दूरध्वनीवरून दिले आणि या तिघांना त्यांच्याच कार्यालयात बंदिस्त केले. त्यामुळे रस्ते विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जी-उत्तर विभाग कार्यालयात धाव घेतली.
पालिका उपायुक्त सुधीर नाईक यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून मनसे कार्यकर्त्यांची समजूत काढली. मात्र पाऊस ओसरताच ४८ तासांत खड्डे बुजविण्याचे आणि कंत्राटदारावर कारवाईचे लेखी आश्वासन देण्याची मागणी त्यांनी केली. निविदांमधील अटी- शर्तीनुसार कंत्राटदारावर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने संदीप देशपांडे यांना दिले आणि अखेर सुमारे सहा तास बंदिस्त असलेल्या उपअभियंत्यांची मुक्तता करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2013 2:39 am

Web Title: bmc engineers allegedly held captive by mns for six hours
Next Stories
1 द्रुतगती महामार्गावर ११ शौचालये बांधण्यास पालिकेला परवानगी
2 ‘वेळेत कर भरणा करा, अन्यथा सवलत रद्द’
3 मुख्यमंत्र्यांविरोधात अशोक चव्हाण आक्रमक
Just Now!
X