मुंबई उच्च न्यायालयाने आदेश देऊनही महापालिका प्रशासन अभियंत्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे पालिका अभियंते २७ मेपासून तीन दिवस ठिय्या आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.
मुंबई महानगरपालिका अभियंत्यांच्या संयुक्त कृती समितीतर्फे १७ डिसेंबर २०१३ पासून ७२ तास ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. मात्र पालिका प्रशासनाने न्यायालयात धाव घेऊन आंदोलनावर स्थगिती आदेश मिळविला. पुढील सुनावणीपूर्वी चार दिवस आधी प्रलंबित प्रश्न महापालिका प्रशासनाकडे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने संयुक्त कृती समितीला दिले होते. तसेच महापालिका प्रशासनाला अभियंत्यांच्या प्रलंबित प्रश्नांचा विचार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार प्रलंबित प्रश्न पालिका प्रशासनाकडे सादर करण्यात आले. मात्र अद्यापही प्रशासनाने समितीच्या प्रतिज्ञापत्राचे उत्तर दिलेले नाही ही बाब संयुक्त कृती समितीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. याबाबत न्यायालयाने प्रशासनाला चार आठवडय़ांमध्ये प्रतिज्ञापत्राचे उत्तर सादर करण्याचे आदेश दिले.
उच्च न्यायालयाने आदेश देऊनही अद्याप प्रशासनाने प्रतिज्ञापत्रावर उत्तर दिलेले नाही. तसेच संयुक्त कृती समितीबरोबर चर्चाही केलेली नाही. त्यामुळे संयुक्त कृती समितीने २७, २८ आणि २९ मे रोजी ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका अभियंत्यांच्या संयुक्त कृती समितीने घेतला आहे.