पावसाळ्यात संगणकीय खड्डे शोध मोहीम यंत्रणा सुर करण्यास केवळ एकाच कंत्राटदाराने रस दाखविल्याने निविदा प्रक्रिया रद्द करून पालिकेने यंदा खड्डय़ांच्या शोध घेऊन त्यांची दुरुस्ती करण्यासाठी फेसबुकचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे. ‘चिफ इंजिनीअर रोडस् अ‍ॅण्ड ट्रॅफिक’ या फेसबुकवर नागरिकांना खड्डेविषयक तक्रारी करता येतील. त्याचबरोबर खड्डे दुरुस्तीसाठी पालिकेच्या विभाग कार्यालयांच्या पातळीवरही स्वतंत्र फेसबुक खाते सुरू करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
पावसाळ्यात रस्त्यावर मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडत असल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. खड्डे वेळच्या वेळी दुरुस्त होत नसल्यामुळे अधिकाऱ्यांवर चाप बसविण्यासाठी काही वर्षांपूर्वी पालिकेने ‘पॉट होल ट्रेकिंग’ यंत्रणा कार्यान्वित केली होती. त्यासाठी प्रोबिटी कंपनीची मदत घेण्यात आली होती. नागरिकांनी मोबाइलवर खड्डय़ाचे छायाचित्र काढून ते या यंत्रणेवर उपलब्ध केल्यानंतर पालिका अधिकारी आणि संबंधित कंत्राटदाराला ४८ तासात खड्डा बुजविणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यामुळे पावसाच्या तडाख्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे तातडीने भरुन रस्ता गुळगुळीत केला जात होता. प्रोबिटी कंपनीची मुदत ३१ मार्च २०१६ रोजी संपुष्टात आली. त्यामुळे ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू व्हॉईस ऑफ सिटीझन’ हे संकेतस्थळ ३१ मार्चपासून बंद झाले. गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने याच कंपनीला हे काम देण्यात येत होते. ‘पॉट होल ट्रेकिंग’ यंत्रणेप्रमाणेच फेसबुकच्या माध्यमातून नवी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून नागरिकांनी ‘चिफ इंजिनीअर रोडस् अ‍ॅण्ड ट्रॅफिक’ या फेसबुकवर खड्डय़ांची छायाचित्रे उपलब्ध केल्यास त्यांची ४८ तासांत दुरुस्ती करण्यात येईल, असे आवाहन पालिकेकड़ून करण्यात आले आहे.प्रत्येक विभाग कार्यालयालाही स्वतंत्र फेसबुक खाते सुरू करण्यात येणार आहे.

एकच कंत्राटदार
कंत्राटदाराची मक्तेदारी होऊ नये म्हणून पालिका आयुक्त अजय मेहता यांनी यावेळी या कामासाठी निविदा मागविल्या होत्या. परंतु केवळ एकाच कंत्राटदाराने त्यासाठी निविदा भरली होती. परिणामी, ही निविदा प्रक्रिया प्रशासनाने रद्द केली.