मुंबईतील सखल भाग जलमय होऊ नयेत यासाठी पालिकेकडून युद्धपातळीवर पावसाळापूर्व कामे हाती घेण्यात आली होती. दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या हिंदमाता परिसराचा अभ्यास करण्यात आला आणि काही पर्जन्य जलवाहिन्या मुख्य पर्जन्य जलवाहिनीशी जोडल्या गेल्या नसल्याचे निदर्शनास आले. पालिकेने युद्धपातळीवर काम हाती घेऊन गायब असलेल्या पर्जन्य जलवाहिन्यांचा शोध घेतला आणि त्या मुख्य पर्जन्य जलवाहिनीला जोडल्या. त्यामुळे यंदा हिंदमाता परिसरात पाणी साचणार नाही, असा दावा पालिका अधिकाऱ्यांकडून करण्यात आला होता. मात्र पहिल्याच पावसाने हा दावा फोल ठरविला.
मुंबईमध्ये शुक्रवारी रात्रीपासूनच पावसाच्या सरी कोसळत होत्या. शनिवारी सकाळी पावसाने जोर धरला आणि सकाळी ११ च्या सुमारास हिंदमाता परिसरात पाणी साचू लागले. त्यामुळे पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. कर्मचाऱ्यांनी पंप सुरू केले आणि पाण्याचा निचरा झाला. मात्र पाणी साचल्यामुळे पादचारी आणि वाहतुकीला फटका बसला. पर्जन्य जलवाहिन्या जोडणीचे काम करूनही या भागातील पाणी साचण्याच्या समस्येवर तोडगा निघू न शकल्याने पालिका अधिकारीही आश्चर्यचकीत झाले आहेत. रविवारी दिवसभरात कुलाबा येथे १२.६ मि.मी., तर सांताक्रूझ येथे ११.६ मि.मी. पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान खात्याच्या सूत्रांनी दिली. शहरात १२ तासांमध्ये सरासरी सुमारे २६.८ मि.मी. पाऊस झाल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.