अतिसंक्रमित क्षेत्रातच जास्त उल्लंघन

मुंबई: मुखपट्टय़ा न लावणाऱ्यांकडून १००० रुपये दंड वसूल करण्याच्या नियमांर्तगत गेल्या तीन दिवसांत पालिकेने ६८ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे अंधेरी पूर्व, मालाड, कांदिवली, दहिसर, बोरिवली, मुलंड या भागांतूनच दंडवसुली झाली आहे. अतिसंक्रमित असलेल्या या भागातच मुखपट्टय़ा लावण्याच्या नियमाचे उल्लंघन होत आहे.

घराबाहेर पडताना तोंडावर मुखपट्टी लावण्याचे बंधन न पाळणाऱ्यांकडून १००० रुपये दंड वसूल करण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला होता. त्यानुसार गेल्या तीन दिवसांत पालिकेने ६८ हजाराचा दंड वसूल केला आहे, तर ३१३ लोकांना समज देऊन सोडून देण्यात आले.

घरातून बाहेर पडताना तोंडावर मुखपट्टय़ा लावूनच बाहेर पडा, असे आवाहन सरकारी यंत्रणांनी केलेले असताना अनेक जण मुखपट्टी लावत नसल्याचे चित्र आहे, तर अनेक जण मुखपट्टी बाजूला करून बोलत असतात. मुखपट्टी बाजूला करून थुंकतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी, तसेच खासगी वाहनांमधून प्रवास करतानाही मुखपट्टी वापरणे बंधनकारक असल्याचे निर्देश महानगरपालिका प्रशासनाने निर्गमित केले आहेत. या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून १ हजार रुपये दंड वसूल करण्यासह भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.

याअंतर्गत ३० जून रोजी ३५ लोकांकडून ३५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला, तर १ जुलै रोजी १६ जणांकडून १६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला, तर ३१३ लोकांना समज देऊन सोडण्यात आले.

या तीन दिवसांत सर्वाधिक दंडवसुली कांदिवलीतून ३५ हजार इतकी झाली, तर त्यापाठोपाठ अंधेरी पूर्वमधून ११ हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तर अंधेरी पूर्वमधून १०५ लोकांना, तर  मुलुंडमध्ये ८३ लोकांना समज देऊन सोडण्यात आले. बोरिवली, दहिसर, कांदिवली, मुलुंडमध्ये रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असताना याच भागांत मोठय़ा संख्येने लोक मुखपट्टय़ा न लावता वावरत आहेत.

दोन महिन्यांपासूनच कारवाई

मुखपट्टी लावण्याचा नियम राज्य सरकारने जेव्हा केला तेव्हापासूनच पालिकेने लोकांकडून क्लीन अप मार्शलच्या माध्यमातून दंड वसूल करण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला २०० रुपये आणि नंतर १००० रुपये दंड वसूल केला जात होता. गेल्या दोन महिन्यांच्या काळात पालिकेने २० लाख ११ हजाराचा दंड वसूल केला आहे. बहुतांश वॉर्डातून शून्य दंडवसुली करण्यात आली आहे. याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र काही विभागांतील क्लीन अप मार्शलचे कंत्राट संपल्यामुळे तिथे मुदतवाढ देण्यात येणार आहे. या भागात पालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत आम्ही लक्ष ठेवत आहोत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.