प्रसाद रावकर, मुंबई

मुंबईत मोकाट फिरणाऱ्या गाई, बैल, म्हैस आदींच्या उपद्रवामुळे पादचाऱ्यांनाच नव्हे तर वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण होत असून या प्रकारांची गंभीर दखल घेत मोकाट फिरणाऱ्या जनावरांवरील दंडात्मक कारवाईचा बडगा अधिक तीव्र करण्यात येणार आहे. मोकाट जनावरांच्या मालकांकडून प्रति जनावर १० हजार रुपये दंड आकारण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे.

मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला गाय-बैलांना बांधून ठेवले जाते. शेण आणि गोमूत्रामुळे पदपथावर अस्वच्छता होते. दररोज सकाळी काही महिला गाय आणि चाऱ्याची टोपली घेऊन मंदिराजवळ अथवा सार्वजनिक ठिकाणी बसून असतात. गाईला चारा भरविण्याच्या निमित्ताने भाविक मंडळी तेथे गर्दी करतात. त्यानंतर दुपारच्या वेळी या महिला गाईंना घेऊन निघून जातात. मात्र गोठय़ाच्या दिशेने निघालेल्या गाई मोकाट सुटतात आणि त्यांचा वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. तसेच रात्रीच्या वेळीही या जनावरांचा स्वैर संचार सुरू असतो. परिणामी, मोकाट जनावरांमुळे नागरिकांच्या मनात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

मोकाट फिरणाऱ्या जनावरांची पालिकेतर्फे धरपकड केली जाते. अशा जनावरांची रवानगी पालिकेच्या कोंडवाडय़ात केली जाते. त्यानंतर जनावरचा मालक दंडाची रक्कम भरून जनावर सोडवून घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. कोंडवाडय़ात डांबलेल्या जनावरांची सुटका करण्यासाठी संबंधित मालकावर २५०० रुपये दंड आकारण्यात येतो. दंडाची रक्कम तुलनेत कमी असल्यामुळे ती भरून मालक जनावरांना सोडवून घेऊन जातात. पुन्हा जनावरे रस्त्यावर मोकाट फिरतात. त्यामुळे दंडाची रक्कम वाढविण्यात यावी अशी मागणी वारंवार मुंबईकरांकडून होत होती. याची दखल घेऊन नगरसेविका नेहल शाह यांनी दंडाची रक्कम वाढवावी, अशी मागणी पालिका सभागृहात ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती.

याची दखल घेत पालिका प्रशासनाने दंडाची रक्कम १० हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्तावही तयार करण्यात आला असून या प्रस्तावाला पालिका सभागृहाकडून मंजुरी मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. यामुळे जनावरांना मोकाट सोडणाऱ्या मालकांमध्ये जरब बसवता येणार आहे.