|| प्रसाद रावकर

 

मुंबई : मुंबई महापालिकेने पूर्व उपनगरांमधील पाच रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी तब्बल २९ कोटी ७८ लाख रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एका रस्त्याची दुरुस्ती तब्बल पाच कोटी ९५ लाख रुपयांना पडणार असून मुंबईकरांसाठी हे रस्ते महागडे ठरणार आहेत.

पूर्व उपनगरांमधील ‘एन’, ‘एल’ आणि ‘टी’ या तीन विभाग कार्यालयांच्या हद्दीतील कुर्ला परिसरातील लाथिया रबर रोडच्या पश्चिमेचा भाग, घाटकोपरमधील जुगलदास मोदी मार्ग, विद्याविहार येथील सोमय्या कॉलेज रोड, मुलुंड येथील हरी ओम नगर रोड आणि आणि डी.डी.यू. रोड या पाच रस्त्यांचे सिमेंट- काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय पालिकेच्या रस्ते विभागाने घेतला आहे. त्याचबरोबर या रस्त्यांवरील पर्जन्य जलवाहिन्या, मलनि:सारण वाहिन्या आणि अन्य अंतर्गत उपयोगिता सेवा सुधारणांची आवश्यक कामे करण्याचे प्रस्तावित केले आहे. या रस्त्यांच्या कामांसाठी रस्ते विभागातील अभियंत्यांनी अंदाजपत्रक तयार केले आहे. या अंदाजपत्रकात पाच रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरण व अन्य कामांसाठी २७ कोटी ३ लाख ७७ हजार ४०५ रुपये खर्च नमूद करण्यात आला आहे. या अंदाजपत्रकाच्या आधारे निविदा जारी केल्या होत्या. काम सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने ८० टक्के रक्कम कंत्राटदाराला देण्याचा आणि उर्वरित २० टक्के रक्कम रस्त्याच्या दोष दायित्व कालावधीत समान हप्त्याने देण्याची अट निविदेमध्ये समाविष्ट केली होती.

१८ महिन्यांत रस्त्यांची बांधणी

या कामांसाठी केवळ दोन कंत्राटदारांनी निविदा सादर केल्या होत्या. लघुत्तम निविदाकार असलेल्या नवदीप कन्स्ट्रक्शनने १.०६ टक्के अधिक दराने काम करण्याची तयारी दर्शविली होती. कागदपत्रांची पडताळणी करून नवदीप कन्स्ट्रक्शन कंपनीला हे २९ कोटी ७८ लाख ३५ हजार ३१२ रुपयांचे काम देण्यावर प्रशासनाने शिक्कामोर्तब केले. कंत्राटदाराला पावसाळ्याचे चार महिने वगळून १८ महिन्यांमध्ये या रस्त्यांची बांधणी करावी लागणार आहे.