मुंबई महापालिकेचा प्रदूषण रोखण्यासाठी कोळशाला नवा पर्याय

झाडपाल्यापासून निर्माण होणाऱ्या कचऱ्यापासून पर्यायी इंधन निर्मितीचा नवा पर्यावरणस्नेही प्रकल्प पालिकेने सुरू केला असून गोदरेज उद्योग समुहाच्या संयुक्त विद्यमाने अंधेरी येथे उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे कोळशाला नवा पर्याय उपलब्ध होणार असून उद्योगांनी या पर्यायी इंधनाचा स्वीकार केल्यास काही अंशी प्रदुषणाला आळा घालणे शक्य होईल, असा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे.

मुंबईमध्ये वृक्षसंपदेमुळे दरदिवशी सुमारे ५० टनाच्या आसपास कचरा निर्माण होतो. तुटून पडलेल्या झाडाच्या फांद्या, विकासाला अडचण ठरल्यामुळे तोडण्यात येणारे वृक्ष, नारळाच्या झाडाच्या झावळ्या आणि पालापाचोळा आदीचा त्यात समावेश असतो. पालिकेने रस्त्यावरील झाडांची छाटणी करण्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर खासगी मालकीच्या भूखंडावरील झाडांच्या फांद्याची छाटणी करण्याची जबाबदारी याच कंत्राटदारांवर सोवपिण्यात आली आहे. वृक्षसंपदेपासून निर्माण होणाऱ्या या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी याच कंत्राटदारांवर आहे. अनेक वेळा खासगी जमिनीवरील वृक्षांची छाटणी केल्यानंतर फांद्या आणि अन्य पालापाचोळा पदपथावरच फेकून देण्यात येतो. त्यामुळे हा कचराही पालिकेलाच उचलावा लागतो.

मुंबईमध्ये दरदिवशी सुमारे ७८०० मे. टन कचरा निर्माण होतो. हा कचरा देवनार, कांजूर आणि मुलुंड कचराभूमीमध्ये टाकण्यात येतो. मात्र आता या तिन्ही कचराभूमींची क्षमता संपुष्टात आली आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नदी-नाल्यातून उपसण्यात येणारा गाळ आणि तरंगता कचरा या कचराभूमींमध्ये टाकण्यास बंदी घालण्यात आली आहे. नालेसफाई करणाऱ्या कंत्राटदाराने गाळ आणि तरंगता कचऱ्याची मुंबईबाहेर विल्हेवाट लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. ही अट झाडांपासून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या कंत्राटदाराला घालण्यात आली आहे. मात्र हे कंत्राटदार झाडपाल्यापासून तयार होणारा कचरा मुंबईबाहेर कुठे टाकतात याची पालिकेला आजही कल्पना नाही. अनेक वेळा हा कचरा पदपथावर दिवसेंदिवस तसाच पडून असतो. थंडीच्या दिवसांमध्ये पदपथाच्या आश्रयाला असणारी मंडळी या कचऱ्याचा शेकोटीसाठी वापर करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. हा कचरा पावसाळ्यापूर्वी उचलला गेला नाही, तर पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात अडथळा बनून सखलभाग जलमय होण्याचाही धोका असतो. त्यामुळे या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेच्या ‘के-पश्चिम’ विभाग कार्यालयाने गोदरेज उद्योग समुहाच्या संयुक्त विद्यमाने अंधेरी पश्चिम येथील बांदिवली गावातील पटेल इंजिनीअरिंगजवळील १५८०.५० चौरस मीटर क्षेत्रफळ जागेत प्रायोगिक तत्वावर एक प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्प उभारणीसाठी सुमारे ८० लाख रुपये खर्च आला असून गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड या कंपनीने आपल्या सामाजिक दायित्व निधीतून हा खर्च भागविला आहे.

भुशाच्या वीटांचा इंधन म्हणून वापर

काही उद्योगांमध्ये इंधन म्हणून कोळशाचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जात असून कोळशामुळे प्रदुषणात भर पडत आहे. मात्र कोळशाऐवजी लाकडाच्या भुशापासून तयार केलेल्या वीटा इंधन म्हणून वापर केल्यास काही प्रमाणात प्रदुषण टाळणे शक्य होऊ शकेल. तसेच झाडपाल्याच्या कचऱ्याचीही विल्हावेट लावणे पालिकेला शक्य होईल. त्यामुळे प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प सुरू करण्यात आला असून तूर्तास ११ महिन्यांसाठी या प्रकल्पाची देखभाल ग्रीन रुट्स लिमिटेड कंपनीवर सोपविण्यात आली आहे. प्रकल्पाच्या देखभालीच्या बदल्यात तेथे भुशापासून तयार होणाऱ्या वीटांच्या विक्रीतून मिळणारा निधी या कंपनीलाच देण्यात येणार आहे.

झाडपाल्यापासून सुमारे ५० टन कचरा

दर दिवशी मुंबईत झाडपाल्यापासून सुमारे ५० टन कचरा निर्माण होत असून आतापर्यंत तो मुंबई बाहेर टाकण्यात येत होता. मात्र आता हा कचरा या प्रकल्पामध्ये आणण्यात येणार असून श्रेडिंग यंत्राच्या साह्यने त्याचे भुशामध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. हा भुसा सुकवून त्यापासून छोटय़ा-छोटय़ा वीटा तयार करण्यात येणार आहेत. या वीटा एक उत्तम इंधन म्हणून वापरता येतील, असा दावा पालिका अधिकाऱ्यांनी केला आहे.

या प्रकल्पामुळे झाडपाल्यापासून तयार होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे सहज शक्य असून इंधन म्हणून कोळशाला एक पर्यायही मिळू शकेल. तसेच कोळशामुळे होणारे प्रदुषण टाळणे शक्य होईल. त्यामुळे काही प्रमाणात पर्यावरणाचे संतुलन राखण्यासही मदत होईल.  – प्रशांत गायकवाड, सहाय्यक आयुक्त, ‘के-पश्चिम’