अवघ्या 14 दिवसांवर गणेशोत्सव आला असताना मंडप परवानगीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या मंडळांना येत्या दोन दिवसांत रीतसर परवानगी देण्याची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केले. तसंच मंडप परवानगीसाठी अर्ज करण्याची मुदत 2 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आल्याची माहितीही महापालिकेकडून देण्यात आली आहे.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या दालनात पालिका अधिकारी, गणेशोत्सव समन्वय समिती यांची संयुक्त बैठक झाली. मंडप परवानग्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. गणेश मंडपासाठी आतापर्यंत दोन हजार ६९४ मंडळांचे अर्ज महापालिकेकडे आले होते. त्यापैकी एक हजार ४२५ मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. ५९४ मंडळांनी दोनदा परवानगीसाठी अर्ज केले होते, अशा मंडळांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. ११५ गणेश मंडळांना पुन्हा अर्ज करता येणार आहेत. याशिवाय, वाहतुकीस अडथळा आणि न्यायालयीन आदेश, अशा विविध कारणांमुळे मुंबईतील २२३ गणेश मंडळांना या वर्षी मंडपाची परवानगी देण्यात आलेली नाही. तरीही या मंडळांनी बेकायदा मंडप बांधल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

गणेशोत्सव मंडळांना ऑनलाइन अर्जामुळे परवानगी तत्काळ मिळेल, असे वाटत होते. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे शेकडो अर्ज परवानगीच्या प्रतीक्षेत रखडले होते. त्यामुळे मंडळांना अर्जाची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवून देण्यात आली होती. आता पुन्हा ही मुदत २ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.