मैदाने, उद्याने सर्वसामान्यांसाठी खुली
गेली अनेक वर्षे देखभालीच्या नावाखाली खासगी संस्थांच्या ताब्यात असलेली तब्बल २१६ मैदाने, उद्याने, उपवने आदी मेअखेपर्यंत पालिका ताब्यात घेणार आहे. ही मैदाने, उद्याने, उपवनांच्या देखभालीसाठी कंत्राटदारांची नियुक्ती करून ती सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुली करण्यात येणार आहेत.
खासगी संस्थांना पालिकेची मैदाने दत्तक तत्त्वावर देण्याबाबतचे धोरण प्रशासनाने आखले होते. आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या छत्राखालील संस्थांच्या ताब्यात असलेली मैदाने, उद्याने वाचविण्यासाठी शिवसेना दत्तक विधानाबाबतच्या धोरणास राजी होती. पालिका सभागृहात या धोरणाला मंजुरी देण्याची घाई शिवसेनेला झाली होती. भाजपने शिवसेनेच्याच पावलावर पाऊल टाकून पालिका सभागृहात या धोरणाला मंजुरी दिली. मात्र त्यामुळे पालिकेची मैदाने, उद्याने खासगी संस्थांच्या घशात जाण्याचा मार्ग मोकळा झाला होता. अखेर मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करीत या धोरणाला स्थगिती दिली. तर यापूर्वी संस्थांना दिलेले हे भूखंड ताब्यात घेण्याचे आदेश पालिका आयुक्तांना दिले. त्यानुसार पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी ही मैदाने, उद्याने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पालिकेने टप्प्याटप्प्याने ७६ मैदाने, उद्याने ताब्यात घेतली असून तेथील सुरक्षा व्यवस्था आणि देखभालीचा प्रश्न निर्माण झाला आहे.