देवनार आणि मुलुंड कचराभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याच्या कामात कुचराई करणाऱ्या कंत्राटदारांचे कंत्राट रद्द करण्याची प्रक्रिया पालिकेने सुरू केली असून या संदर्भात तत्त्व ग्लोबल एन्व्हॉयर्न्मेंन्ट आणि तत्त्व ग्लोबल रिन्यूएबल एनर्जी कंपनीवर पालिकेने नोटीस बजावली आहे.
मुंबईमध्ये दररोज ९,४०० मेट्रिक टन घनकचरा देवनार, मुलुंड आणि कांजूरमार्ग येथील कचराभूमीवर टाकून त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जाते. देवनार आणि मुलुंड कचराभूमी ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर कंत्राटदारांना हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. तत्त्व ग्लोबल एन्व्हॉयर्न्मेंन्टला देवनार कचराभूमी २००९ मध्ये, तर तत्त्व ग्लोबल रिन्यूएबल एनर्जी कंपनीला २०१० मध्ये मुलुंड कचराभूमी हस्तांतरित करण्यात आली आहे. देवनार कचराभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करणे आणि २००० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारण्याचे काम ग्लोबल एन्व्हॉयर्न्मेंन्टवर सोपविण्यात आले होते. तसेच मुलुंड कचराभूमीमध्ये ५०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारण्याचे व कचराभूमी बंद करण्याचे काम तत्त्व ग्लोबल रिन्यूएबल एनर्जी कंपनीला देण्यात आले होते. मात्र दोन्ही कंत्राटदारांकडून या कामाची पूर्तता होऊ शकलेली नाही. याबाबत पालिकेने अनेक वेळा पाठपुरावा आणि पत्रव्यवहारही केला होता; परंतु दोन्ही प्रकल्प रेंगाळल्याचे लक्षात आल्याने पालिकेने आता या कंत्राटदारांचे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

तळोजाचा पर्याय
कंत्राट रद्द झाल्यानंतर देवनार कचराभूमीत शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी निविदा मागविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, तळोजा येथील प्रस्तावित कचराभूमी सुरू होईपर्यंत देवनार कचराभूमीवर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. मात्र मुलुंड कचराभूमीवर कचरा टाकणे बंद करण्यात येणार आहे.