News Flash

इस्तंबूलच्या रेस्तराँची पालिका गटनेत्यांना भुरळ

तुर्कस्तानमधील इस्तंबूल शहरातील नागरिकांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेने सुरू केलेली रेस्तराँ पाहून तुर्कस्तानच्या दौऱ्यावर स्वखर्चाने गेलेले पालिकेतील गटनेते भारावून गेले

| January 13, 2015 03:29 am

तुर्कस्तानमधील इस्तंबूल शहरातील नागरिकांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेने सुरू केलेली रेस्तराँ पाहून तुर्कस्तानच्या दौऱ्यावर स्वखर्चाने गेलेले पालिकेतील गटनेते भारावून गेले असून मुंबई महापालिकेनेही शहरामध्ये अशी रेस्तराँ सुरू करावीत, अशी मागणी गटनेत्यांकडून करण्यात आली आहे. परिणामी, नागरिकांना परवडेल अशा दरात सकस आहार उपलब्ध होईल आणि पालिकेच्या महसुलातही भर पडेल, असे गटनेत्यांचे म्हणणे आहे.
मुंबई महापालिकेतर्फे मुंबईकरांना पाणीपुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती, आरोग्य आदी नागरी सुविधा पुरविल्या जातात. इस्तंबूलमधील स्थानिक स्वराज्य संस्थाही या सुविधा तेथील नागरिकांना उपलब्ध करीत आहे. त्याचबरोबर नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी त्यांना उत्तम दर्जाचा आहारही उपलब्ध करण्याचे काम स्थानिक स्वराज्य संस्थेद्वारे इस्तंबूलमध्ये केले जात आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थेने आजघडीला इस्तंबूलमध्ये तब्बल ५० रेस्तराँ सुरू केली असून तेथे पारंपरिक पदार्थ उपलब्ध आहेत. ही रेस्तराँ केवळ इस्तंबूलमधील नागरिकांचीच नव्हे तर विदेशी पर्यटकांचीही आकर्षण बनली आहेत.
मुंबई महापालिकेने इस्तंबूलच्या धर्तीवर मुंबईत रेस्तराँ सुरू करावीत आणि सर्वसामांन्य नागरिकांना परवडतील अशा दरात सकस आहार उपलब्ध करावा, अशी मागणी मनसेचे गटनेते संदीप देशपांडे आणि समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख यांनी केली आहे. इस्तंबूलमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रेस्तराँमध्ये या गटनेत्यांनी भोजनाचा आस्वादही घेतला.
याच स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे इस्तंबूलमध्ये मेट्रो बस, जलवाहतूक, युरेशिया मेट्रो आदी सुविधाही उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मेट्रो बससाठी मार्गिका उपलब्ध असून प्रत्येक बस थांबा आणि त्याच्या आसपासच्या परिसरावर सीसी कॅमेरांची करडी नजर आहे. एखाद्या बस थांब्यावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाल्याचे सीसी टीव्ही कॅमेराच्या नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्याच्या निदर्शनास येताच तात्काळ त्या थांब्यावर एक बसगाडी पाठवून प्रवासांची व्यवस्था केली जाते, असे सांगत संदीप देशपांडे यांनी नियंत्रण कक्षात अनुभवलेल्या क्षणांना उजाळा दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2015 3:29 am

Web Title: bmc group leaders aggressive demand to build istanbul restaurant in mumbai
टॅग : Bmc
Next Stories
1 दिव्यत्वाची जेथ प्रचिती..
2 अभाविप, युवासेनेला ‘अच्छे दिन’
3 नंदुरबार येथील सहाजणांकडून कर्ज घेतले
Just Now!
X