मुंबईतल्या डोंगरी भागात कोसळलेल्या कौसरबाग इमारतील पीडितांसाठी मुंबई महानगरपालिकेने तात्पुरत्या निवाऱ्याची सोय केली आहे. येथील पालिकेच्या इमामवाडा मुलींच्या माध्यमिक शाळेत ही सोय करण्यात आली आहे, पालिकेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. या इमारतीमध्ये १० ते १५ कुटुंब राहण्यास होते.

महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माहितीनुसार, दोन जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला असून पाच जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर, दुर्घटनाग्रस्त इमारत १०० वर्षे जुनी असून धोकादायक इमारतीच्या यादीत तिचा समावेश नव्हता. पुनर्विकासासाठी इमारत विकासकाकडे दिली होती, मात्र त्याने याबाबत कार्यवाही सुरु केली होती की नाही याबाबत माहिती घेण्यात येत आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरु असल्याचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.