सुरक्षा यंत्रणा नावापुरत्या, रक्षक कामचुकार
दस्तुरखुद्द पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी फाइलवर नमूद केलेल्या शेऱ्यांमध्ये अज्ञात इसमाने विकास नियोजन विभागात जाऊन फेरफार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पालिका मुख्यालयातील सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रवेशद्वारांवरील नादुरुस्ती स्कॅनिंग यंत्रणा आणि कामचुकार सुरक्षारक्षक यामुळे पालिका मुख्यालय म्हणजे ‘आओ जाओ घर तुम्हाला’ अशी अवस्था झाली आहे. पालिका मुख्यालयात येणाऱ्या व्यक्तींची तपासणी तर दूरच; साधी चौकशी करण्याची जबाबदारीही सुरक्षा यंत्रणा पार पाडत नसल्याचे दिसून येत आहे.
जोगेश्वरी परिसरातील मजास गावातील एका मोठय़ा भूखंडाच्या खरेदी सूचनेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची सूचना अजोय मेहता यांनी याबाबतच्या फाइलवर नमूद केली होती. पालिका आयुक्त कार्यालयातून ही फाइल विकास नियोजन विभागात पाठविण्यात आली होती. विकास नियोजन विभागातील एका केबिनमध्ये अज्ञात व्यक्तीने प्रवेश केला आणि या फाइलवरील आयुक्तांच्या शेऱ्यांमध्ये ‘सर्वोच्च न्यायालयात जाऊ नये’ अशा आशयाचे बदल केल्याचे उघडकीस आले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पालिकेत मोठा गोंधळ उडाला. प्रशासनाने तात्काळ या विभागातील सीसी टीव्हीवरील चित्रणाची तपासणी केली. याच विभागातील एका कारकुनाने ही फाइल एका केबिनमध्ये ठेवली आणि त्यानंतर अज्ञात व्यक्तीने तेथे जाऊन फाइलमध्ये फेरफार केल्याचे उघडकीस आले. या घटनेनंतर पालिका मुख्यालयाच्या सर्व प्रवेशद्वारांवरील सीसी टीव्ही कॅमेरातील चित्रण तपासण्यात आले. या अज्ञात व्यक्तीने १६ मे रोजी सकाळी ११ वाजता प्रवेशद्वार क्रमांक सातमधून पालिका मुख्यालयात प्रवेश केल्याचे सीसी टीव्ही कॅमेरातील चित्रणावरून उघड झाले. त्या वेळी या प्रवेशद्वारावर तीन सुरक्षारक्षक तैनात होते. ही अज्ञात व्यक्ती पालिका मुख्यालयात प्रवेश करताना एक सुरक्षारक्षक मोबाइलवर बोलत होता, तर अन्य दोघे जण निवांतपणे खुर्चीवर बसून होते. या प्रकरणाची चौकशी सुरू झाली असून हे चित्रण पालिका प्रशासनाने ताब्यात घेतले आहे. मात्र या प्रकारानंतर मुख्यालयातील सुरक्षा रामभरोसे असल्याचे सिद्ध झाले आहे.
पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांनी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे विचारपूस करणे अपेक्षित आहे. मुख्यालयात येणारी व्यक्ती कोण आहे, कोणत्या कामासाठी आणि कोणत्या विभागात त्याला जावयाचे आहे याची माहिती सुरक्षारक्षकांनी विचारणे गरजेचे आहे. तसेच पालिका अधिकारी-कर्मचारी असल्यास त्याचे ओळखपत्र तपासणेही गरजेचे आहे. सोबत घेऊन येणाऱ्या बॅग आणि अन्य सामानाची तपासणीही सुरक्षारक्षकांनी करायला हवी; पण गेल्या काही वर्षांपासून पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारांवर सावळा गोंधळ सुरू आहे. प्रवेशद्वारांवरील स्कॅनिंग यंत्र अभावानेच सुरू असतात. तैनात सुरक्षारक्षक एकमेकांशी गप्पा मारण्यात किंवा मोबाइलवर बोलण्यात मश्गूल असतात असे निदर्शनास आले आहे.
रात्री झोपा
ज्या दिवशी पालिका मुख्यालयात येऊन अज्ञात व्यक्तीने आयुक्तांच्या शेऱ्यामध्ये फेरफार केली, त्याच दिवशी रात्री पालिका मुख्यालयाच्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवेशद्वारावर तैनात असलेला सुरक्षारक्षक प्रवेशद्वार बंद करून मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत झोपल्याचे उघडकीस आले आहे. या सर्व प्रकरणांची पालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.
प्रवेश नियमांचे उल्लंघन
पालिका मुख्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी करून त्यांना आत सोडण्याची जबाबदारी सुरक्षारक्षकांवर आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांची ओळखपत्रे तपासून त्यांना मुख्यालयात प्रवेश देणे बंधनकारक आहे. तसेच पालिकेशी संबंध नसलेल्या व्यक्तींना पास देऊन पालिका मुख्यालयात सोडण्याची व्यवस्था आहे.
संबंधित अधिकाऱ्याला भेटल्यानंतर त्याची स्वाक्षरी पासवर घेऊन संबंधित व्यक्तीने तो सुरक्षारक्षकांकडे परत करणे अपेक्षित आहे; परंतु मुळात असा पास फारच कमी व्यक्ती घेऊन मुख्यालयात प्रवेश करतात. कंत्राटदार अथवा त्यांच्याशी संबंधित मंडळींची प्रवेशद्वारांवर चौकशीही केली जात नाही.
या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस चौकशी करीत असून त्यांचा अहवाल सादर झाल्यानंतर या प्रकरणी जबाबदार असलेल्या सर्वावर कारवाई करण्यात येईल.
– अजोय मेहता, पालिका आयुक्त
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 2, 2018 12:51 am