तोटय़ामुळे आर्थिक डोलारा डळमळीत झालेल्या बेस्टला नव्याकोऱ्या ३०० बसगाडय़ा खरेदी करण्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत घेण्यात आला असून आगामी अर्थसंकल्प मंजुरीदरम्यान मिळालेल्या ५०० कोटी रुपयांतून हा निधी देण्यात येणार आहे. दिवसेंदिवस तोटा वाढत असल्याने कर्मचाऱ्यांना बोनसही देणे शक्य नसलेल्या बेस्टला पालिकेच्या या मदतीमुळे दिलासा मिळणार आहे.
बेस्ट उपक्रमाच्या परिवहन खात्याच्या ताफ्यातील तब्बल ३०० बसगाडय़ा कालबाह्य़ झाल्या आहेत. लवकरच या बसगाडय़ा ताफ्यातून वगळण्यात येणार आहे. परिणामी त्याचा बससेवेवर परिणाम होण्याची शक्यता असून त्याचा प्रवाशांना आणि पर्यायाने बेस्टला फटका बसण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने नव्याकोऱ्या ३०० बसगाडय़ा खरेदीसाठी लागणारा निधी बेस्ट उपक्रमाला देण्याची तयारी दर्शविली आहे. पालिकेचा २०१५-१६ या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प मंजूर करताना प्रशासनाने स्थायी समितीला ५०० कोटी रुपये निधी दिला आहे.