सत्ताधारी शिवसेनेतूनच नाराजीचा सूर

मुंबई महापालिकेतील सत्ताधारी नगरसेवकांवर अधिराज्य गाजविणाऱ्या सभागृह नेत्यांनी मलईदार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थायी समितीमधील बित्तंबातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या मेव्हण्याची तेथे नियुक्ती करवून घेतल्याने शिवसेनेतच कुरबुरी सुरू झाल्या आहेत. एकीकडे सभागृह नेते यशवंत जाधव आणि स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश कोरगावकर यांच्यात शहकाटशहाचे राजकारण सुरू असतानाच जाधव यांचे मेव्हणे विलास मोहिते यांची स्थायी समितीतील ऊठबस अनेकांना खटकू लागली आहे. मात्र, ही नियुक्ती ‘मातोश्री’च्या आशीर्वादानेच झाल्याची चर्चा असल्याने उघडपणे बोलण्यास कुणीही तयार नाही.

मुंबई महापालिकेत प्रत्येक राजकीय पक्षाचा ‘अर्थ’पूर्ण व्यवहार सांभाळण्यासाठी काही व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबाबत कोणताही लेखी करार केला जात नाही. राजकीय पक्षांनी नियुक्त केलेली व्यक्ती त्या त्या पक्षांच्या कार्यालयात घुटमळत असतात. संबंधित अधिकारी, विरोधी पक्षांचे नगरसेवक आणि कंत्राटदार यांच्याशी संधान साधून आपल्या पक्षाचा ‘अर्थ’पूर्ण कारभार चालविण्यासाठी ही मंडळी मदत करीत असतात. मात्र, आता या नियुक्तीवरूनच शिवसेनेत कुरबुरी सुरू झाल्या आहेत. पालिकेतील सभागृह नेते यशवंत जाधव यांचे मेव्हणे विलास मोहिते यांची अशाच प्रकारे स्थायी समितीच्या कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. सभागृह नेत्यांच्या आदेशानुसार विलास मोहिते स्थायी समिती अध्यक्षांच्या कर्मचाऱ्यांच्या कार्यालयात दिवसभर ठिय्या मांडून असतात. स्थायी समिती अध्यक्षांना भेटण्यास येणाऱ्या व्यक्ती, समितीमध्ये सादर होणारे प्रस्ताव यावर त्यांनी बारकाईने लक्ष ठेवले आहे. या कामात चिटणीस विभागातील दोन कर्मचारी त्यांना मदत करीत आहेत. पालिकेच्या कार्यालयात दररोज नित्यनियमाने येणाऱ्या या व्यक्तीबाबत प्रशासनाकडून अद्यापही कोणतीच विचारणा करण्यात आलेली नाही. मात्र स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनाला खेटून असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कार्यालयातील या ‘विलासी’ राज्यास सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवकही कंटाळले आहेत.

लवकरच स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. पालिकेतील कोटय़वधी कामांच्या प्रस्तावांना स्थायी समितीची मान्यता घ्यावी लागते. म्हणूनच ही समिती मलईदार समिती म्हणून परिचित आहे. महापालिका सभागृह नेते आता स्थायी समिती अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे समजते. समितीची सूत्रे हाती येण्यापूर्वी तेथील बित्तंबातम्या आपल्यापर्यंत पोहोचाव्यात यासाठी त्यांनी हा डाव मांडल्याचे बोलले जात आहे. मात्र, ‘मातोश्री’च्या मर्जीनेच ही नियुक्ती झाल्याची कुजबुज असल्याने उघडपणे बोलण्यास सध्या कुणीही तयार नाही.

स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांना यापूर्वी चिटणीस विभागातून निवृत्त झालेली व्यक्ती मदत करीत होती. त्यांच्याऐवजी मोहिते स्थायी समिती अध्यक्षांना मदत करतात.

यशवंत जाधव, सभागृह नेता

अनेक सहकारी शिवसैनिक पालिकेत कामानिमित्त माझ्याकडे येत असतात. तसेच मोहितेही आपल्याकडे येतात. पालिकेकडून ते कोणताही मोबदला घेत नाहीत.

रमेश कोरगावकर, स्थायी समिती अध्यक्ष