साफसफाई केलेल्या मोठे नाल्यांचे महापौरांना दर्शन घडवणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांचे लहान नाल्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. दोन्ही बाजूंनी झोपडय़ांनी वेढलेल्या या नाल्यांमध्ये गेल्या वर्षभरात प्रचंड कचरा, गाळ साठला आहे. परिणामी या नाल्यांच्या आसपासचा परिसर जलमय होण्याची चिन्हे आहेत.
गेल्या वर्षी मे महिन्याच्या उत्तरार्धात नाल्यातील गाळ काढायला सुरुवात केल्याने अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या होत्या. यावर जोरदार टीका झाल्याने यावर्षी पालिकेने १ एप्रिलपासूनच नालेसफाईला सुरुवात केली आणि २० मेपर्यंत सर्व नाले साफ केले जातील, असे जाहीर केले. १४ मेपर्यंत नाल्यांची ६० टक्के सफाई केल्याचा दावा पालिका अधिकाऱ्यांनी केला असून महापौरांनी बुधवारी त्याची पाहणीही केली. मात्र दौऱ्यात केवळ मोठय़ा नाल्यांची पाहणी झाली. प्रत्यक्षात लहान नाल्यांमधील गाळ अजून काढलेलाच नाही. झोपडपट्टीने वेढलेले या नाल्यांमधील गाळ काढणे जिकरीचे होते. त्याच वेळी झोपडपट्टीमधून वर्षभर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे हे नाले भरले आहेत. या नाल्यातील कचरा काढला गेला नाही तर पाण्याचा ओघ पुढे जाऊच शकणार नाही व मुंबई तुंबण्याची शक्यता आहे.
महापौरांच्या दौऱ्यात केवळ मोठे नाले दाखवले गेले, असा आरोप सभागृह नेत तृष्णा विश्वासराव यांनी केला आहे. लहान नाल्यांची परिस्थिती नेमकी काय आहे व ते कधीपर्यंत साफ होणारा, याची माहिती पालिका अधिकाऱ्यांना पत्र पाठवून मागविण्यात आल्याचे तृष्णा विश्वासराव यांनी सांगितले. मध्य मुंबईतील कोरबा मीठागर, सीम इंडिया, शांतीनगर, दीनदयाळ नाला अजूनही गाळाने भरलेले आहेत, असे त्या म्हणाल्या. लहान नाल्यांमधील ३० टक्के गाळ काढण्यात आला आहे. त्यांची जलद गतीने साफसफाई करण्याची सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे, असे अतिरिक्त आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास म्हणाले.