वांद्रे (प.) रेल्वे स्थानक परिसरातील हॉटेल्स आणि अन्य काही दुकानांनी रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणांवर पालिकेच्या एच-पश्चिम विभाग कार्यालयाने गुरुवारी कारवाई केली. रस्त्यावर केलेले बांधकाम या कारवाईत तोडून टाकण्यात आले. त्याचबरोबर वांद्रे रेक्लमेशन येथील काही अनधिकृत बांधकामेही गुरुवारी जमीनदोस्त करण्यात आली.
वांद्रे (प.) रेल्वे स्थानकाबाहेर अनेक हॉटेल्स आणि अन्य वस्तूंची दुकाने आहेत. गेल्या अनेक वर्षांपूर्वीपासून या हॉटेल्स आणि दुकान मालकांनी रस्त्यावर अतिक्रमण करून बांधकामे केली होती. या अतिक्रमणामुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. या रस्त्याचे विस्तारीकरण प्रस्तावित आहे. त्यामुळे या अनधिकृत बांधकामांवर पालिकेच्या ‘एच-पश्चिम’ विभाग कार्यालयाने हातोडा चालवीत ती जमीनदोस्त केली. यामध्ये यादगार हॉटेल, दानिश कबाब कॉर्नर, सिख कबाब कॉर्नर आदी हॉटेल्स, तसेच अत्तर, स्टेशनही आदी दुकानांचा समावेश होता. पालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक आणि आरोग्य विभागाने संयुक्तपणे ही कारवाई केली. साहाय्यक आयुक्त शरद उघाडे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक अभियंता राजेश यादव, उपअभियंता भोसले यांनी ही कारवाई केली.