मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार महापालिकेने सादर केलेल्या सुधारित विकास नियोजन आराखडय़ाच्या प्रारूपावर संस्था-नागरिकांनी सादर केलेल्या सूचना-हरकतींच्या सुनावणीला सोमवारपासून सुरुवात करण्यात येणार आहे. राज्य सरकारचे तीन तर पालिकेच्या स्थायी समितीमधील तीन अशी सहा सदस्यीय नियोजन समिती सुनावणी घेणार असून, हे काम डिसेंबरअखेपर्यंत पूर्ण करावे लागणार आहे.

नागरिक, संस्था आदींनी सुधारित विकास आराखडय़ाच्या प्रारूपावर सादर केलेल्या सूचना-हरकतींची सुनावणी घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नियोजन समितीमध्ये सत्ताधाऱ्यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव आणि भाजपचे गटनेते मनोज कोटक यांचा समावेश करण्यात आल्याची घोषणा महापौर स्नेहल आंबेकर यांनी पालिका सभागृहात केली. मात्र विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांचा समावेश समितीमध्ये करण्यात न आल्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस नगरसेवकांनी पालिका सभागृहातून सभात्याग केला होता. नियोजन समितीची पहिली बैठक शनिवारी पालिका मुख्यालयात पार पडली. या बैठकीमध्ये समिती सदस्यांना सूचना-हरकतींवरील सुनावणीचे काम समजावून सांगण्यात आले.