अखंड भारत हागणदारी मुक्त व्हावा म्हणून जनतेला शौचालयाचा वापर करण्याचे आवाहन करण्याची केंद्र सरकारची सूचना मुंबई महापालिकेला चांगलीच महागात पडली आहे. या कामी उत्साह दाखवत कांदिवलीमध्ये एका व्यक्तीला उठाबशा काढण्याची आणि दंड करण्याची कारवाई पालिका अधिकाऱ्याच्या अंगलट आली आहे.
केंद्र सरकारने ‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत १९ एप्रिलपासून दोन-तीन दिवस स्वच्छतेसाठी ‘गांधीगिरी’ पद्धतीने मोहीम राबविण्याची सूचना केली होती. उघडय़ावरच प्रातर्विधी उरकणाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन शौचालयाचा वापर करण्याची विनंती करावी, अशी सूचना ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविणाऱ्या अधिकाऱ्यांनी पालिकेला केली होती. त्यानुसार १९ एप्रिल रोजी पालिका अधिकाऱ्यांनी मोहीम हाती घेतली.
कांदिवली येथे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने उघडय़ावर शौचाला बसलेल्या एका व्यक्तीला हटकले. दोघांत शाब्दिक चकमक उडाली. संतापलेल्या अधिकाऱ्याने ‘त्या’ व्यक्तीस उठाबशा काढायला लावल्या. इतकेच नव्हे तर त्याच्याकडून २०० रुपये दंडही वसूल केला. याप्रकरणी एका सामाजिक संस्थेने मानव अधिकार आयोगाकडे धाव घेतल्यामुळे पालिका अडचणीत आली आहे. त्यामुळे प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत झोपडीमध्ये शौचालय बांधण्यास परवानगी देण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. मात्र दाटीवाटीने उभ्या असलेल्या झोपडय़ांमध्ये शौचालय बांधण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. झोपडपट्टीपासून ३० मीटर अंतरावर मलनिस्सार वाहिनी असल्यास छोटय़ा मलवाहिन्या झोपडय़ांतील शौचालयांना जोडण्याचे आदेश प्रशासनाने अधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र झोपडय़ा एकमेकांना खेटून उभ्या असल्यामुळे त्यात उभारण्यात येणाऱ्या शौचालयांशी मलवाहिन्या जोडणे अवघड बनले आहे.