‘मुंबई तुला बीएमसीवर भरवसा नाय काय’ म्हणत देशाच्या आर्थिक राजधानीतील रस्त्यांवरील खड्डय़ांचा प्रश्न देशपातळीवर गाजवणाऱ्या आरजे मलिष्का हिलाच आमंत्रित करत मुंबई महापालिका प्रशासनाने यंदा पावसाच्या तोंडावर पालिका कशी सज्ज आहे याची माहिती दिली.

पावसाळ्यात वाहनचालकांना खड्डय़ांमधून वाट काढताना मनस्ताप होतोच. शिवाय वाहतुकीचा वेगही मंदावतो. या प्रश्नावरील मलिष्काचे विडंबनात्मक गाणे चांगलेच गाजले. त्यामुळे यंदा पालिकेने पावसाळापूर्व पालिकेने काय काय तयारी केली आहे ती पाहण्यासाठी मलिष्काला खास आमंत्रित केले होते. मलिष्काने गुरुवारी लव्हग्रोव्ह येथील उदंचन केंद्राची आणि पालिकेच्या आपत्कालीन कक्षाची पाहणी केली. आता मलिष्का आपल्या पुढच्या गाण्यात काय म्हणते याची उत्सुकता मुंबईकरांमध्ये आहे.

मलिष्का हिच्यासोबत तिचे सहकारी व अभिनेते अजिंक्य देव यांनी पंपिंग स्टेशनला आणि आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट दिली. या वेळी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासह पालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी, अतिरिक्त आयुक्त उपस्थित होते. पंपिंग स्टेशनमधील पावसाचे पाणी समुद्रात सोडण्यासाठीच्या यंत्रणेची त्यांनी माहिती करून घेतली. याशिवाय पावसाळ्याच्या दिवसांत ज्या भागात पाणी भरते तिथल्या पाण्याचा निचरा कसा केला जातो हेही त्यांना दाखवण्यात आले.

पावसाळ्याच्या दिवसांत पाणी उपसा करणाऱ्या सहा उदंचन केंद्रांपैकी पाच सुरू करण्यात आली असून उर्वरित एक या पावसाळ्यात सुरू केले जाणार आहे. चमडावाडी नाल्यालगत असलेली अनधिकृत बांधकामे पूर्णपणे काढून टाकण्यात आली आहेत. या वर्षी फार कमी ठिकाणी पाणी भरेल. तसेच, या वर्षी रस्त्यांची कामे चांगली झाल्याने खड्डय़ांचा त्रास फारसा जाणवणार नाही, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. यंदा २०० कि.मी. लांबीच्या रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली असून खड्डे भरण्यासाठी कोल्डमिक्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत तलाव क्षेत्रात पाऊस नसला तरी असलेला जलसाठा जुलैअखेपर्यंत पुरविण्याचे नियोजन असल्याचे त्यांना सांगण्यात आले. मुंबईतील घनकचरा, रस्ते, आरोग्यविषयक सुविधा, पाणीपुरवठा, नाल्यांची सफाई या महत्त्वपूर्ण विषयांबाबत पालिका निष्ठापूर्वक कामे करीत असून प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमांनी ही कामे मुंबईकरांपर्यंत पोहोचावीत, असे आवाहन परदेशी यांनी केले आहे.

समाजमाध्यमांमुळे तरुण वर्ग प्रभावित होतो. आमच्या कर्मचाऱ्यांनी खूप काम केले तरी त्याची टिंगल केली की त्यांच्यात खूप निराशा येते. प्रश्नातील सगळे गांभीर्य निघून जाते. त्यामुळे आम्ही मलिष्काला पालिका काय काम करते ते दाखवण्याचे ठरवले. या भेटीनंतर तिचे मतपरिवर्तन झाले असावे, अशी अपेक्षा आहे.

– प्रवीणसिंह परदेशी, आयुक्त, महापालिका