१८५ स्टॉलधारकांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा

वारंवार बजावूनही नियम धाब्यावर बसवणाऱ्या दक्षिण मुंबईमधील फॅशन स्ट्रीटवरील तब्बल १८५ बाकडेधारक फेरीवाल्यांवर पालिकेने ‘कारणे दाखवा’ नोटिस बजावली आहे. पदपथांवर अतिक्रमण करून रहदारी आणि पादचाऱ्यांना त्रास देणाऱ्या बाकडेधारकांना ४८ तासांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीनंतरही अतिरिक्त जागेचा वापर करणाऱ्या बाकडेधारकांच्या बाकडय़ांचा परवाना रद्द करण्यात येणार आहे.

तरुण बेरोजगारांना रोजगार मिळावा या उद्देशाने पालिकेने दक्षिण मुंबईमधील महात्मा गांधी मार्गावर ३९६ तरुणांना बाकडय़ांचा परवाना दिला. पालिकेने काही जणांना १ बाय १ मीटर, तर काही जणांना १.५ बाय १.५ मीटर जागेत व्यवसाय करण्यास परवानगी दिली. मात्र काहींनी या बाकडय़ांचे स्टॉलमध्ये रूपांतर केले. ही मंडळी इतक्यावरच थांबलेली नाहीत. तर आखून दिलेल्या जागेबाहेर लोखंडी आणि लाकडी बांबूच्या साह्य़ाने टांगण्या उभ्या केल्या आणि त्यावर कपडे टांगण्यास सुरुवात केली, तसेच नेमून दिलेल्या जागेत अतिक्रमण करून काही जणांनी आपल्या  व्यवसायाचा विस्तारही केला. या परवानाधारक बाकडेधारकांच्या आशीर्वादाने काही अनधिकृत फेरीवाल्यांनी पदपथावर पथाऱ्या पसरल्याचे निदर्शनास आले होते. तयार कपडय़ांची बाजारपेठच महात्मा गांधी मार्गावर उभी राहिली आणि अल्पावधीतच कपडय़ांची ही बाजारपेठ फॅशन स्ट्रीट म्हणून परिचित झाली. फॅशन स्ट्रीटमध्ये तरुणाईची प्रचंड गर्दी होऊ लागली.

वाढत्या गर्दीचा फायदा उठवून बाकडेधारकांनी पदपथावर मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमण केले. या प्रकाराची गंभीर दखल घेत पालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयाने काही वर्षांपूर्वी ३० बाकडेधारकांवर पालिकेने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. मात्र या बाकडेधारकांनी न्यायालयात धाव घेतली. बाकडेधारकांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अन्य काही बाकडेधारकांनी नेमून दिलेल्या जागेव्यतिरिक्त अन्य जागेत टांगण्या उभारुन अतिक्रमण केले आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर पालिकेने अनेक बाकडेधारकांना ताकीद दिली.

मात्र वारंवार सूचना करुनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या तब्बल १८५ बाकडेधारकांवर पालिकेने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. पालिकेने या बाकडेधारकांना ४८ तासांची मुदत दिली आहे. या मुदतीनंतरही अतिक्रमण केल्याचे आढळून आल्यास या बाकडेधारकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

पालिकेने यापूर्वी कारवाई केल्यानंतर संबंधित ३० बाकडेधारकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे बाकडेधारक पदपथावर अतिक्रमण करुन रहदारी आणि पादचाऱ्यांना अडथळा निर्माण करीत असल्याची तक्रार न्यायालयाकडे करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. न्यायालयानेच या फेरीवाल्यांना रोखण्याबाबत आदेश द्यावे, अशी विनंतीही न्यायालयाला करण्यात येणार असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

फॅशन स्ट्रीटवरील बाकडेधारक फेरीवाल्यांकडून नियमांचा भंग करण्यात येत आहे. नेमून दिलेल्या जागेपेक्षा अतिरिक्त जागेचा ते वापर करत आहेत. याबाबत अनेकांनी पालिकेकडे तक्रार केली आहे. या तक्रारींची गंभीर दखल घेऊन या १८५ बाकडेधारकांवर ‘कारणे दाखवा’ नोटिस बजावण्यात आली आहे.

किरण दिघावकर, सहाय्यक आयुक्त, ‘ए’ विभाग कार्यालय