जुनागड प्राणिसंग्रहालयाची अटपूर्ती करण्यासाठी फेरनिविदा

प्रसाद रावकर, मुंबई

गुजरातच्या जुनागडमधील प्राणिसंग्रहालयातील चार सिंहांचे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय आणि उद्यानांमधील (राणीची बाग) आगमन लांबणीवर पडले आहे. सिंहांच्या बदल्यात जुनागडच्या प्राणिसंग्रहालयाला देण्यात येणारे चार झेब्रे अद्यापही पालिकेला मिळू शकलेले नाहीत. निविदा प्रक्रिया राबवून झेब्रे मिळविण्याच्या पालिकेच्या प्रयत्नांना अपयश आले असून, झेब्रे मिळविण्यासाठी पालिकेची वणवण सुरूच आहे. आता प्रशासनाने झेब्य्रांसाठी फेरनिविदा मागविण्याचा निर्णय घेतला आहे.

देश-विदेशी पर्यटकांचे आकर्षण स्थान बनलेल्या मुंबईमधील ‘राणीच्या बागे’चे सुशोभीकरण आणि नूतनीकरणाचा प्रकल्प पालिकेने हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत देश-विदेशातील विविध प्राणी राणीच्या बागेत दाखल होणार आहेत. याच योजनेअंतर्गत पालिकेने गुजरातमधील जुनागड येथील साक्करबाग प्राणिसंग्रहालयातून सिंहाच्या दोन जोडय़ा राणीच्या बागेत आणण्याची तयारी सुरू केली होती. साक्करबाग प्राणिसंग्रहालयाने चार सिंहांच्या बदल्यामध्ये जिराफ अथवा गिब्बन माकडांची मागणी केली होती. मात्र जिराफ आणि गिब्बन माकड देणे शक्य नसल्यामुळे राणीची बाग आणि साक्करबाग प्राणिसंग्रहालयातील अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेअंती झोब्य्राच्या दोन जोडय़ा देण्यावर एकमत झाले, अशी माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

राणीच्या बागेत झेब्रा नाही. त्यामुळे अन्य ठिकाणांहून विकत घेऊन झेब्रा साक्करबाग प्राणिसंग्रहालयाला द्यावे लागणार आहेत. प्राणिसंग्रहालयाला प्राणी मिळवून देणाऱ्या काही संस्था मुंबईत कार्यरत आहेत. या संस्थांच्या माध्यमातून चार झेब्रे मिळविण्याचा प्रयत्न पालिकेने सुरू केला आहे. त्यासाठी पालिकेने निविदा मागविल्या होत्या. मात्र निविदा प्रक्रियेला एकाही संस्थेकडून प्रतिसाद मिळू शकलेला नाही. चार झेब्रे मिळविण्यासाठी पालिकेने फेरनिविदा मागविण्याची तयारी सुरू केली आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

झेब्रे मिळाल्यानंतर त्यांचे साक्करबाग प्राणिसंग्राहलयाला हस्तांतरण करण्यात येणार आहे. त्याच दरम्यान साक्करबाग प्राणिसंग्रहालयातील चार सिंहांचे राणीच्या बागेत आगमन होईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

म्हैसूरमधून बिबळ्या आणि तरसाची जोडी आणणार

या प्रकल्पानुसार १८ देशी, तर पाच परदेशी असे एकूण २३ नव्या प्राण्यांचे भविष्यात राणीच्या बागेत  दर्शन घडणार आहे. त्यात तरस, कोल्हा, लांडगा, देशी अस्वल, रानकुत्रे, गवा, साळिंदर, माऊस डिअर, बाराशिंगा, सांबर, पाणमांजर, आशियाई सिंह, बंगाली वाघ, लेपर्ड कॅट, रानमांजर उदमांजर आदी भारतीय, तर एमू, पाणघोडा, जग्वार, झेब्रा, हम्बोल्ट पेंग्विन यांचा समावेश आहे. सर्वप्रथम हम्बोल्ट पेंग्विन ‘राणीच्या बागे’त दाखल झाले. अलीकडेच मंगलोर येथील पिलीकुलालू प्राणिसंग्रहालयातील बिबळ्या आणि कोल्ह्य़ांची जोडीही राणीच्या बागेत दाखल झाली.  त्याचबरोबर आता म्हैसूरमधील प्राणिसंग्राहलयातून तरस आणि बिबळ्याची प्रत्येकी एक जोडी आणण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.