एकात्मिक प्रणाली अंतिम टप्प्यात; ५७० कोटी रुपयांचे कंत्राट

मुंबई : कचरा वाहतुकीतील भ्रष्टाचार दूर करण्याबरोबरच त्याच्या व्यवस्थापनात सुसूत्रता यावी, यासाठी मुंबई महापालिकेने नवी मुंबई महापालिकेच्या धर्तीवर आणलेल्या एकात्मिक प्रणालीकरिता तब्बल ५७० कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात येणार आहे. यासंदर्भातील निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून या परिसरातील एक हजार मेट्रिक टन कचरा उचलणे, त्याचे वर्गीकरण करणे आणि वाहतूक करण्यासाठी महानगैरपालिका ५७० कोटी रुपये खर्च करणार आहे. फक्त कचरा वाहतूक करण्यासाठी वॉर्डनुसार दर दिवसाला १ लाखापासून ४ लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. एकात्मिक कचरा प्रणालीत दिवसाला चार लाख ते १० लाख रुपयांपर्यंत खर्च येईल.

शहरात दररोज साधारण साडेसात हजार मेट्रिक टन कचरा गोळा होतो. झोपडपट्टय़ांमधील कचरा उचलण्याची जबाबदारी स्वच्छ मुंबई प्रबोधन योजनेमधील गटांची असते, तर इमारतींमधील कचरा गोळा करण्याची जबाबदारी संबंधित संस्थांची असते. प्रवेशद्वाराजवळील पेटय़ांमधील हा कचरा पालिकेचे कर्मचारी उचलून गाडय़ांमध्ये भरतात. या गाडय़ांमधून कचरा कचराभूमीवर पोहोचवण्याची जबाबदारी कंत्राटदारांची असते. कचरा वर्गीकरणासाठी वेगळे गट असतात. साधारण चार स्तरांवर सुरू असलेल्या या कामात एखाद्या गटाने काम झटकले किंवा त्यांच्या कामातील नियोजन चुकले की कचरा जागच्या जागी राहतो. या यंत्रणेमुळे स्वच्छ शहर अभियानात मुंबईचे मानांकन घसरले होते. एकात्मिक कचरा प्रणाली राबवलेल्या नवी मुंबईचा पहिल्या दहात क्रमांक आला होता. त्यामुळे नवी मुंबईची कचरा उचलण्याची पद्धत महापालिकेने टप्प्याटप्प्याने स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबईत दिवसाला साधारण ८०० मेट्रिक टन कचरा गोळा होतो, तर शहरात साडेसात ते आठ हजार मेट्रिक टन कचरा गोळा केला जातो. त्यामुळे सुरुवातीला केवळ काही उपनगरांत ही पद्धत अवलंबण्यात येणार आहे. टी (मुलुंड), आर दक्षिण (कांदिवली) येथे प्रत्येकी एक तर आर उत्तर (दहिसर) व आर मध्य (बोरिवली) या विभागांसाठी एकत्रित कंत्राट देण्यात येणार आहे. या तीन ठिकाणी एकूण ८०० ते ८५० मेट्रिक टन कचरा गोळा होतो. आरएफआयडी रीडर असलेल्या कचऱ्याच्या डब्यातून कचरा उचलणे, त्यासाठी मजूर पुरवणे, ओला व सुका कचऱ्याची वेगळी वाहतूक करणे, त्यासाठी जीपीएस असलेल्या गाडय़ा वापरणे अशी सर्व कामे एकाच कंत्राटदाराकडून केली जाणार आहेत. कचरापेटय़ांवर आयएफआरडी रीडर तसेच गाडय़ांवर जीपीएस यंत्रणा असल्याने कचरागाडय़ा कुठे आहेत, कोणत्या ठिकाणी कचरा गोळा केला गेला हे पॅनलवरील एका दृष्टिक्षेपात समजू शकते, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यासंबंधी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून पी.डब्ल्यू.जी., ए.जी. इनवायरो आणि मेट्रो वेस्ट हॅण्डलिंग यांनी कमी दराने निविदा भरल्या आहेत. टी विभागासाठी १२० कोटी रुपये, आर दक्षिण विभागासाठी १७९ कोटी तर आर मध्य व आर उत्तर यांच्यासाठी २६९ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

बदल काय होणार?

* कचरापेटय़ांवर आयएफआरडी रीडर तसेच गाडय़ांवर जीपीएस यंत्रणा असल्याने कचरागाडय़ा कुठे आहेत, कोणत्या ठिकाणी कचरा गोळा केला गेला हे पालिकेच्या अधिकाऱ्यांना पॅनलवरील एका दृष्टिक्षेपात समजू शकते.

* झोपडपट्टय़ांमधील कचरा उचलण्याची जबाबदारी स्वच्छ मुंबई प्रबोधन योजनेंतर्गत नेमलेल्या गटांवरच असेल. मात्र त्यांना कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करावे लागेल.

एकात्मिक कचरा वाहतूक प्रणाली

विभाग                                         खर्च           प्रति दिवस खर्च

आर दक्षिण (कांदिवली)           १७९ कोटी           ७ लाख

आर मध्य आणि उत्तर

(बोरिवली व दहिसर)              २६९ कोटी            १० लाख

टी (मुलुंड)                              १२० कोटी               साडेचार लाख

 

काही प्रभागांतील कचरा गाडय़ांवर होणारा खर्च (प्रति दिवशी)

’ ए – १ लाख ४२ हजार

’ ई – २ लाख ३६ हजार

’ के पूर्व – ४ लाख ३१४