महापालिकेच्या निविदाप्रक्रियेवर जीवरक्षक संस्थांचा आक्षेप

मुंबईमधील समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक तैनात करण्याचे कंत्राट देण्यासाठी एका कंपनीला डोळ्यापुढे ठेवून निविदांमध्ये जाचक अटींचा समावेश करण्यात आल्याचा आरोप करीत मुंबईमधील जीवरक्षक संघटनांनी एल्गार पुकारला आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या धर्तीवर निविदा प्रक्रिया राबवून सर्वानाच संधी द्यावी, अशी मागणी जीवरक्षक संस्थांकडून करण्यात येत आहे.

मुंबईतील सहा समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक तैनात करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला असून त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. गणेशोत्सवात विसर्जनाच्या वेळी मुंबईतील जीवरक्षक संस्थांकडून विनामूल्य सेवा दिली जाते. गणेश विसर्जनाच्या निमित्त मोठय़ा संख्येने भाविक समुद्रात उतरतात. त्या बदल्यात कोणताही मोबदला या जीवरक्षकांना दिला जात नाही.

गणेशोत्सवात गणेश विसर्जन सोहळ्यात मुंबईतील जीवरक्षक संस्था व्यस्त असतानाच पालिकेने सहा समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक तैनात करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली. त्यामुळे या जीवरक्षक संस्थांना निविदा प्रक्रियेत सहभागी होणे शक्य झाले नाही. ही बाब पालिकेच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर निविदा प्रक्रियेची मुदत २७ सप्टेंबपर्यंत वाढविण्यात आली.

मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक सेवा देण्यास उत्सुक असलेल्या मुंबईतील संस्थांच्या प्रतिनिधींनी निविदांमधील अटी-शर्ती पाहिल्यानंतर ते चक्रावून गेले. तीन वर्षांमध्ये तीन कोटी रुपये उलाढाल असलेल्या कंपनीला या निविदा प्रक्रियेत सहभागी होता येईल अशी अट घालण्यात आली आहे. या अटीमुळे मुंबईतील बहुतांश सर्वच जीवरक्षक संस्था बाद ठरल्या आहेत. एखाद्या कंपनीबरोबर संयुक्त करार करून जीवरक्षक कंपनीला या निविदा प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. यामुळे मुंबईतील जीवरक्षक संस्थांचा अन्य कंपनीबरोबर सहकार्य करार करून या निविदा प्रक्रियेत सहभागी होण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे.

जीवरक्षक सेवा पुरविणाऱ्या कंपनीने अथवा संस्थेकडे कोणती उपकरणे असणे आवश्यक आहे याचा उल्लेखही निविदा प्रक्रियेत करण्यात आलेला नाही. समुद्रकिनाऱ्यांवर २४ तास जीवरक्षक तैनात असणे गरजेचे आहे. पण निविदेतील जीवरक्षकांच्या पाळ्यांची वेळ चक्रावून टाकणारी आहे. जीवरक्षक सेवा पुरविणाऱ्या कंपनीचे मुंबई अथवा ठाण्यामध्ये कार्यालय असावे अशी अट निविदेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. जर मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक तैनात करायचे असतील, तर कंपनीचे कार्यालय मुंबईत असणे गरजेचे आहे. ठाण्यात कार्यालय असावे हा पर्याय निविदेत का देण्यात आला आहे, असे अनेक प्रश्न मुंबईतील जीवरक्षक संस्थांनी उपस्थित केले आहेत. केवळ एका कंपनीला डोळ्यासमोर ठेवून या निविदा काढण्यात आल्या आहेत, असा आरोप करीत मुंबईतील जीवरक्षक संस्थांनी ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली आहे.

या कंत्राटासाठी काढण्यात आलेल्या निविदेतील अटींबाबत पालिका आयुक्तांना पत्र पाठवून कल्पना देण्यात आली आहे.

-रुपेश कोठारी, गिरगाव चौपाटी लाईफगार्ड असोसिएशन


या कंत्राटासाठी २२.३५ लाख रुपये अनामत रक्कम भरण्याची अट निविदेमध्ये घालण्यात आली आहे. मुंबईतील छोटय़ा संस्थांना ही अनामत ठेव रक्कम भरणे परवडणारच नाही.

-सूरज वालावलकर, जल सुरक्षा दल