..तर ७०३ कोटी रुपयांची बचत

गेली काही वष्रे सतत वाढत असलेल्या तोटय़ामुळे आíथक डोलारा डळमळीत झालेल्या बेस्ट उपक्रमाला सावरण्यासाठी बेस्ट आणि पालिका प्रशासनाने संयुक्त कृती आराखडा आखला असून या आराखडय़ाची अंमलबजावणी करण्यात आल्यास बेस्टची ७०३ कोटी रुपयांची बचत होऊ शकेल. या उपाययोजनांमुळे तोटा भरून निघेल आणि बेस्टच्या तिजोरीत सुमारे ११३ कोटी रुपये अतिरिक्त निधी जमा होऊ शकेल. तसेच राज्य सरकार, पालिकेच्या दारात कटोरा घेऊन उभे राहण्याची वेळ बेस्टवर ओढवणार नाही. मात्र त्यासाठी बेस्ट प्रशासन, अधिकारी – कर्मचारी आणि प्रवासी यांना काही अंशी झळ सोसावी लागणार आहे. तरच बेस्टला सुगीचे दिवस पाहता येतील.

गेली काही वष्रे बेस्ट उपक्रमाचा तोटा सातत्याने वाढत आहे. बेस्टने २०१७-१८ या आíथक वर्षांच्या अर्थसंकल्पात ५९० कोटी रुपये तोटा होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. बेस्टला वाचविण्यासाठी राज्य सरकार आणि पालिकेने आíथक मदत करावी आशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. पालिकेने बेस्टला १ हजार कोटी रुपये द्यावे अशी मागणी बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. दोन वर्षांपूर्वी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी पालिकेने बेस्टला १६०० कोटी रुपये दिले होते. आता पुन्हा १ हजार कोटी रुपयांची मागणी होऊ लागली आहे. वारंवार पालिकेकडे मदतीची याचना करणाऱ्या बेस्टने पायावर उभे राहण्याची गरज असल्याचे मत बेस्टमधील अधिकारीच व्यक्त करू लागले आहेत.

कामगार कपात?

बेस्टमध्ये कामगार कपात करण्यात येणार असल्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. मात्र तशी कोणतीही सूचना या आराखडय़ात करण्यात आलेली नाही. आस्थापना खर्च नियंत्रणात ठेवण्यासाठी भविष्यात बेस्टमध्ये नोकर भरती बंद करावी असेही सूचित करण्यात आले आहे.