कोटय़वधी रुपयांची कंत्राटे लाटून मुंबईतील रस्त्यांची दुर्दशा करणाऱ्या कंत्राटदारांना आता पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची १२ ते ६० टक्के कमी रकमेत डागडुजी करण्यास तयार झाले असून पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी सारासार कोणताही विचार न करता या प्रस्तावांना मंजुरी देत ही कामे कंत्राटदारांच्या खिशात टाकली. एकूण २१ कोटींची कामे तीन कंत्राटदार ११ कोटी ३ लाख १९ हजार रुपयांमध्ये करणार आहेत. त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, मुंबईकरांना पुन्हा एकदा खड्डेमय रस्त्यांतून वाट काढावी लागण्याची चिन्हे आहेत.
मुंबईमधील पालिकेच्या परिमंडळ तीन, चार आणि सातमधील रस्त्यांची पावसाळ्यापूर्वी डागडुजी करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. रस्त्यांची दुरुस्ती, खड्डे-चर भरणे आणि पेव्हर ब्लॉक आदींच्या कामांसाठीच्या निविदा भरण्यासाठी अनेक कंत्राटदार पुढे सरसावले होते. तीनही परिमंडळामध्ये प्रत्येकी सात कोटी रुपयांची अशी एकूण २१ कोटी रुपयांची कामे देण्यात येणार होती. मात्र परिमंडळ तीनमध्ये कोनार्क स्ट्रक्चरल इंजिनीयर्सने ३ कोटी ३७ लाख ५४ हजार रुपयात, परिमंडळ चारमध्ये व्हीएनसी इन्फ्राप्रोजेक्टस्ने ३ कोटी ४९ लाख ६५ हजार रुपयात, तर परिमंडळ सातमध्ये इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कंपनीने ६ कोटी १६ लाख रुपयांमध्ये कामे करण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे प्रशासनाने ही कामे या कंत्राटदारांना देण्याचा निर्णय घेत स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत त्याबाबतचा प्रस्ताव सादर केला. हे प्रस्ताव पुकारताच विरोधकांनी त्यास विरोध केला. स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनीही संख्याबळाच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर केला. कंत्राटे मिळवण्यासाठी पालिकेने निश्चित केलेल्या दरांपेक्षा किमान १२ ते कमाल ६० टक्के कमी दर भरण्याची क्लृप्ती या कंत्राटदारांनी लढवली आहे. यापूर्वीही काही कंत्राटदारांनी निश्चित रकमेपेक्षा कमी रक्कम आकारत ही कंत्राटे पदरात पाडून घेतली होती.