28 October 2020

News Flash

पडझडीमुळे चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर; पालिकेचे राज्य सरकारला पत्र

गेल्या अनेक वर्षांमध्ये चैत्यभूमीची मोठय़ा प्रमाणावर दुरुस्तीच करण्यात आलेली नाही.

(संग्रहित छायाचित्र)

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : आंबेडकरी जनतेचे श्रद्धास्थान असलेल्या दादरच्या शिवाजी पार्कजवळील चैत्यभूमीच्या वास्तूमध्ये पडझड होत असून चैत्यभूमीच्या दुरुस्तीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. चैत्यभूमीच्या पुनर्बाधणीसाठी वास्तुविशारदाची नियुक्ती करून एक वर्ष होत आले. मात्र पुनर्बाधणी वा दुरुस्तीबाबत कोणत्याच हालचाली झालेल्या नाहीत. ही वास्तू धोकादायक बनू लागल्याने तेथे वास्तव्यास असलेल्या भंतेजींना स्थलांतर करण्याची सूचना पालिकेकडून करण्यात आली आहे. पुरातन वास्तू असलेल्या चैत्यभूमीबाबत योग्य तो धोरणात्मक निर्णय घेण्याचे साकडे मुंबई महापालिकेने राज्य सरकारला घातले आहे.

गेल्या अनेक वर्षांमध्ये चैत्यभूमीची मोठय़ा प्रमाणावर दुरुस्तीच करण्यात आलेली नाही. त्यामुळे भिंती आणि छपराच्या सिमेंटच्या गिलाव्याची पडझड होऊ लागली आहे. ही एक मजली वास्तू समुद्रकिनाऱ्यालगत आहे. खाऱ्या हवेमुळे वास्तूच्या बांधकामात वापरलेल्या लोखंडी तुळया गंजल्या आहेत. परिणामी चैत्यभूमीची दुरुस्ती वा पुनर्बाधणीबाबत निर्णय घेणे गरजेचे बनले आहे. त्यासाठी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी राज्य सरकारला पत्र पाठविले आहे.

पुरातन वारसा वास्तू श्रेणी ‘अ’ आणि पर्यटनस्थळ ‘अ’ श्रेणीमध्ये चैत्यभूमीचा समावेश आहे. त्यामुळे ही वास्तू जनत करणे आवश्यक आहे. ही वास्तू भारतीय बौद्ध महासभेच्या अखत्यारीत असून वास्तूचा प्रत्यक्ष ताबा भीमराव आंबेडकर यांच्याकडे आहे. चैत्यभूमीच्या पुनर्बाधणीबाबत भीमराव आंबेडकर आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये ५ ऑक्टोबर २०१९ रोजी चर्चा झाली होती. या वास्तूचे संरचनात्मक परीक्षण करण्यात यावे असे त्यांना कळविण्यात आले होते, असे या पत्रात म्हटले आहे.

चैत्यभूमीच्या पुनर्बाधणीसाठी वास्तुविशारदाची नेमणूक करण्यात आल्याचे पालिकेला २१ नोव्हेंबर २०१९ रोजी पत्र पाठवून कळविण्यात आले होते. मात्र या संदर्भात कोणतीही कार्यवाही सुरू असल्याचे निदर्शनास आले नाही.

गेल्या काही दिवसांमध्ये चैत्यभूमीतील भिंती आणि छपराच्या गिलाव्याचा काही भाग अधूनमधून कोसळत आहे, तर वास्तूला मुख्य आधार असलेल्या खांबांना भेगा पडत असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी ही वास्तू धोकादायक बनू लागली आहे. तेथे वास्तव्यास असलेल्या भंतेजींना स्थलांतरित होण्याची सूचना पालिकेकडून करण्यात आली आहे. याबाबत भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांना पालिकेकडून वारंवार वास्तूच्या स्थितीबाबत माहिती देण्यात आल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

चैत्यभूमीची वास्तू पालिकेची नाही. या वास्तूची मोठय़ा प्रमाणावर दुरुस्ती वा पुनर्बाधणी करण्याची गरज आहे. ही बाब लक्षात घेत याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा यासाठी राज्य सरकारला विनंती करण्यात आली आहे.

– किरण दिघावकर, साहाय्यक आयुक्त, ‘जी-उत्तर’ विभाग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2020 2:58 am

Web Title: bmc letter to state government for repair of chaityabhoomi zws 70
Next Stories
1 Coronavirus : करोनामुक्तांचे प्रमाण ८२ टक्क्यांवर
2 ‘मेट्रो २ अ’ मार्गिकेतील अवघड टप्पा पूर्ण
3 ‘सीटी स्कॅन’ आता दोन हजार रुपयांत!
Just Now!
X