पर्युषण पर्वामध्ये चार दिवस पशुवधगृह बंद ठेवण्याबरोबरच मुंबईत मांसविक्रीवर बंदी घातल्यामुळे प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत होती. मात्र पालिका सभागृहात महापौरांनी शुक्रवारी मतदानाअंती ही मांसविक्री बंदी उठविण्याचा आणि पशुवधगृह सुरू ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यामुळे आता राज्य सरकारच्या निर्णयानुसार पर्युषण काळात केवळ दोन दिवस मांसविक्री बंदी राहणार आहे.

राज्य सरकारने आणि पालिकेने पर्युषण पर्वामध्ये प्रत्येकी दोन दिवस पशुवधगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मीरा-भाईंदरमध्ये पर्युषण पर्वामध्ये आठ दिवस मांसविक्री बंदी घातल्याने उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. त्याच पाश्र्वभूमीवर यंदा मुंबईत चार दिवस मांसविक्री बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे वाद चिघळत गेला.
पर्युषण पर्वामध्ये पहिला आणि शेवटचा दिवस पशुवधगृह बंद ठेवण्यात येते. त्याबाबत २३ जुलै १९६४ आणि १ सप्टेंबर १९९४ रोजी पालिका सभागृहात ठराव मंजूर करून पशुवधगृह दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख यांनी या दोन्ही ठरावांचा फेरविचार व्हावा यासाठी प्रस्ताव मांडला होता. प्रस्ताव सादर होताच भाजप नगरसेवक संतापले. अखेर स्नेहल आंबेकर यांनी या प्रस्तावावर मतदान घेण्याचा निर्णय घेतला.
मतदानामध्ये १ सप्टेंबर १९९४ च्या ठरावाच्या बाजूने २३, तर विरोधात ११३ मते पडली. रईस शेख यांच्या प्रस्तावाच्या बाजूने कौल मिळाल्याने स्नेहल आंबेकर यांनी पर्युषण पर्वामध्ये पर्युषण पर्वामध्ये पशुवधगृह सुरू ठेवण्याचा निर्णय जाहीर केला.