गणेशोत्सवात पडलेला पाऊस अखेर मुंबईकरांना पावला असून तलावसाठय़ात गेल्या चार दिवसात तब्बल १ लाख ३५ दशलक्ष लिटरने वाढ झाली आहे. हा वाढीव साठा मुंबईला ३८ दिवस पुरेसा आहे. मुंबईतील तुळशी हा सर्वात लहान तलावही मंगळवारी भरून वाहू लागला असून गेल्या वर्षी २८ जुलैला हे तलाव भरले होते. पावसाच्या सरी कायम राहिल्या तर मोडकसागर, तुळशीपाठोपाठ मध्य वैतरणा तलावही लवकरच भरण्याची शक्यता आहे. मुंबईकरांवरील पाणीकपातीची तलवार खाली उतरणार नसली तरी अतिरिक्त कपातीचे संकट यामुळे दूर होण्याचा अंदाज आहे.
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पावसाने संपूर्ण राज्यात हजेरी लावली होती. मात्र मुंबईच्या तलावक्षेत्रात अवघा तीन मिलीमीटर पाऊस पडला होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पाणीसाठय़ात अजिबात वाढ झाली नव्हती. मात्र त्यानंतर गेले चार दिवस ठाणे व नाशिकमध्ये पडलेल्या मध्यम सरींनी तलावसाठय़ात तब्बल १ लाख ३५ हजार दशलक्ष लिटरची वाढ केली आहे. शुक्रवारी ९ लाख ९४ हजार दशलक्ष लिटरवर असलेला पाणीसाठा मंगळवारी ११ लाख २९ हजार दशलक्ष लिटरवर पोहोचला. दिवसाला साडेतीन हजार दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असलेल्या शहराची तहान हा वाढीव पाणीसाठा ३८ अतिरिक्त दिवस भागवू शकतो. शहराला दहा महिन्यांसाठी सुमारे १४ लाख दशलक्ष पाणी आवश्यक आहे. याचाच अर्थ आजमितीला सर्व तलावांतील एकूण पाणीसाठा ८१ टक्के झाला आहे. जुलैअखेरीस ७० टक्के असलेल्या साठय़ात दहा टक्के वाढ झाली आहे. सध्या मुंबईत १५ टक्के पाणीकपात आहे. ३० सप्टेंबर रोजी पाणीसाठय़ाचा आढावा घेऊन कपातीचा फेरविचार करण्यात येणार आहे. आताचा पाण्याचा साठा लक्षात घेता पाणीकपातीचे संकट दूर होणारे नसले तरी अतिरिक्त दहा टक्के कपात टळण्यासाठी हा पाऊस महत्त्वाचा ठरू शकेल.
गेले पाच दिवस राज्याच्या सर्व भागांत बरसलेला पाऊस आता देशाच्या उत्तर व वायव्य भागात सक्रिय झाला आहे. मुंबईसह कोकणात काही ठिकाणी पावसाच्या मध्यम सरी अपेक्षित असल्या तरी राज्याच्या इतर भागांत मात्र पावसाचा जोर ओसरला आहे. सप्टेंबरच्या अखेरच्या आठवडय़ात पावसाच्या सरी पुन्हा येण्याची शक्यता आहे.