|| प्रसाद रावकर

दवाखान्यांमध्ये यंत्रे धूळ खात पडून, तर रसायनाची मुदत संपण्याच्या मार्गावर :- गरीब रुग्णांसाठी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये अवघ्या दहा रुपयांत रक्तचाचण्या उपलब्ध करून देण्याची पालिकेची योजना नियोजनशून्य कारभारामुळे बारगळल्यात जमा आहे. या योजनेसाठी पालिकेने रक्तचाचणी यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली. मात्र प्रयोगशाळा आणि अन्य पायाभूत सुविधा नसल्यामुळे बहुतांश दवाखान्यांमध्ये उपलब्ध केलेली यंत्रसामग्री धूळ खात पडली आहे.

आता गेल्या वर्षी रक्तचाचण्यासाठी उपलब्ध केलेले रसायन वापराविना पडून असून त्याची मुदत (एक्सपायरी डेट) नोव्हेंबरमध्ये संपुष्टात येत आहे. त्यामुळे गरिबांसाठी सुरू केलेली योजना शरपंजरी असून यासाठी खर्च केलेले कोटय़वधी रुपये पाण्यात जाण्याची चिन्हे आहेत. या प्रकरणी प्रशासनाने साहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांवर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यास सुरुवात केल्याचे समजते.

रुग्णांना पालिकेच्या दवाखान्यांमध्येच रक्तचाचणी अल्पदरात  उपलब्ध व्हावी यासाठी पालिकेने ही सुविधा सुरू केली. खासगी रोगनिदान प्रयोगशाळांमध्ये आर्थिकदृष्टय़ा न परवडणाऱ्या रक्तचाचण्या  या दवाखान्यांतच अवघ्या १० रुपयांमध्ये करण्याच्या योजनेमुळे रुग्णांना दिलासा मिळेल, असा या योजनेमागील प्रशासनाचा उद्देश होता. रक्ततपासणीसाठी आवश्यक असलेले रसायन (रिएजन्टस्) नोव्हेंबर २०१८ मध्ये दवाखान्यांना उपलब्ध करण्यात आले. मात्र, अन्य साधन-सामग्रीच्या पुरवठय़ाकडे दुर्लक्ष झाले.

मायक्रोटीप्स, सीरिंज, फ्लोराईड टय़ूब आदी विविध वस्तूंचा मात्र अपुरा पुरवठा करण्यात आला. तसेच चाचण्यांसाठी आवश्यक असलेली प्रयोगशाळा आणि अन्य पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे ही योजना अपयशी ठरली. देखभालीअभावी काही दवाखान्यांमधील यंत्रसामग्री नादुरुस्त झाल्याचे प्रकारही गेल्या वर्षभरात अनेक वेळा घडले, असे काही दवाखान्यांमधील डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर ‘लोकसत्ता’ला सांगितले.

गेल्या वर्षी दवाखान्यांना रक्ततपासणीसाठी उपलब्ध केलेल्या रसायनांची मुदत नोव्हेंबर २०१९ मध्ये संपुष्टात येत आहे. काही महिन्यांपूर्वी दवाखान्यांमधील वरिष्ठांनी कनिष्ठ कर्मचाऱ्यांना या रसायनांचा वापर वाढविण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र अधूनमधून नादुरुस्त होणारे यंत्र, प्रयोगशाळा आणि पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे चाचण्या होऊ शकल्या नाहीत. परिणामी रसायनाचा साठा पडून राहिला. आरोग्य विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून वरिष्ठांनी संबंधितांवर कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. त्यामुळे दवाखान्यांमधील कर्मचाऱ्यांच्या छातीत धडकी भरली होती.

रसायनाचा मोठा साठा शिल्लक राहिल्याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. या प्रकरणी संबंधित दवाखान्यांमधील साहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांवर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे दवाखान्यांमधील सर्वच डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. या संदर्भात आरोग्य विभागातील मुख्य कार्यकारी अधिकारी पद्मजा केसकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला.