‘प्रभाग’फेरी – ‘एम – पूर्व’

अंतर्गत भाग :   देवनार, अणुशक्ती नगर, गोवंडी, मानखुर्द, ट्रॉम्बे, वाशी नाका

house burglars
घरफोडी करणाऱ्या टोळीचे जाळे उद्ध्वस्त, हसन कुट्टीसह १० गुन्हेगार ताब्यात
Case against Sudhakar Badgujar
सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात गुन्हा, सलीम कुत्ता पार्टी प्रकरण
Death threat to Deputy Chief Minister devendra Fadnavis on social media case filed in Santacruz police station
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी, सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
manoj jarange patil marathi news, manoj jarange patil marathi reservation marathi news, manoj jarange patil sagesoyre marathi news
जरांगे यांची दुसरी माघार, ‘सगेसोयरे’च्या अधिसूचनेची कोंडीच

गेल्या अनेक वर्षांपूर्वी हा परिसर निर्जन होता. त्यामुळेच मुंबईत निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी देवनार येथे कचराभूमी उभारण्यात आली. मुंबईकरांच्या कचऱ्यामुळे या कचराभूमीत कचऱ्याचे डोंगर उभे राहिले आहेत. मुंबईची लोकसंख्या वाढत गेली आणि येथे झोपडपट्टय़ा उभ्या राहिल्या. ‘एम-पूर्व’ विभाग ८५ ते ९० टक्के  झोपडपट्टय़ांनी व्यापला आहे. या झोपडपट्टय़ा राजकीय पक्षांच्या मतपेढय़ा बनल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची कुणाचीच हिम्मत झाली नाही. या भागात लोकवस्ती वाढत असताना काँग्रेसची नजर तेथे पडली आणि काँग्रेसने मतदारांना आपलेसे केले. अनेक वर्षे या भागावार काँग्रेसने सत्ता गाजविली. बहुतांश वस्त्या मुस्लीमबहुल असल्याने कालौघात मतदारांनी काँग्रेसची साथ सोडत समाजवादी पार्टीला आपलेसे केले. त्यामुळे या भागात समाजवादी पार्टीचा झेंडा फडकू लागला आहे. आता या परिसरात एएमआयएमने शिरकाव केला असून भविष्यात येथील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

बकाल वस्त्यांनी हा विभाग व्यापला आहे. येथे मनोरंजन अथवा विरंगुळ्याची ठिकाणे नाहीत. मात्र एकेकाळी आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टीवर राज्य गाजविणारे प्रख्यात अभिनेते राज कपूर यांचा देवनारमधील टुमदार बंगला मुंबईकरांच्या चर्चेचा विषय होता.

टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्स ही नामांकित संस्थाही याच भागात आहे. दक्षिण मुंबईतून जलदगतीने चेंबूरमार्गे बाहेर पडता यावे यासाठी उभारलेल्या पूर्व मुक्त मार्गाचे दुसरे टोक ‘एम-पूर्व’ भागात आहे. झोपडपट्टय़ांमधील विद्यार्थ्यांसाठी पालिकेने येथे मोठी अभ्यासिका बांधली असून लवकरच ती विद्यार्थ्यांसाठी खुली होणार आहे.

बहुमजली झोपडय़ा

वांद्रय़ातील बेहरामपाडय़ाच्या पावलावर पावले टाकत येथेही झोपडय़ांवर बहुमजले चढविण्यात आले आहेत. काही महिन्यांपूर्वी पालिकेने झोपडीवरील १४ फुटांपेक्षा अधिक उंच मजल्यांवर कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र झोपडपट्टीवासीयांनी विरोध केल्यामुळे पालिकेला कारवाई मागे घ्यावी लागली होती. त्या वेळी झोपडपट्टीवासीयांपुढे पोलिसांनाही नमते घ्यावे लागले होते. आजही येथील झोपडय़ांवर मजले चढविण्याचे काम सुरूच आहे.

बकाल झोपडपट्टय़ा

या परिसरात बैंगनवाडी, शिवाजी नगर, आदर्श नगर, कमला रमण नगर, महाराष्ट्र नगर, शास्त्री नगर, जाकीर हुसैन नगर, रफिक नगर अशा अस्ताव्यस्त पसरलेल्या मोठय़ा झोपडपट्टय़ा आहेत. अरुंद वाटा, मलनिस्सारण-मलजल वाहून नेणाऱ्या वाहिन्यांचा अभाव, अपुरी आणि अस्वच्छ सार्वजनिक शौचालये, अस्वच्छता यामुळे या वस्त्या बकाल बनल्या आहेत. काही झोपडपट्टय़ा देवनार कचराभूमीला खेटून आहेत.  दरुगधी आणि कुजणाऱ्या कचऱ्यामुळे या झोपडपट्टय़ांमधील रहिवाशांना कायम आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

माफिया राज

वीज, पाणी, कचरा माफिया आणि झोपडपट्टी दादांचे या भागात साम्राज्य आहे. कचरा माफिया कचराभूमीतील कचऱ्याव बक्कळ पैसा कमवीत आहेत. पाणी माफिया पालिकेच्या पाण्याची चोरी करून ते झोपडपट्टीवासीयांना विकून श्रीमंत बनत आहेत. वीज माफियांनी या भागात वीजपुरवठय़ासाठी आपले जाळे तयार केले आहे. तर झोपडपट्टी दादांचे झोपडय़ा बांधण्याचे सत्र सुरूच आहे.

‘त्यांच्या’वर पुन्हा विस्थापित होण्याची वेळ

राज्य सरकारने २००५ मध्ये ‘महात्मा गांधी पथ योजना’ राबविली आणि या योजनेंतर्गत विकासाआड येणारी घरे हटवून प्रकल्पग्रस्तांचे माहुल परिसरात पुनर्वसन केले. माहुल, महाराष्ट्र नगर या परिसरात प्रकल्पग्रस्त वास्तव्यासाठी गेले. पण तेथे गेल्यानंतर त्यांना अपुरा पाणीपुरवठा, अस्वच्छता अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यांना बांधून दिलेल्या इमारतींना आता गळती लागली आहे. पण त्याकडे लक्ष द्यायला कुणीच तयार नाही.

प्रकल्पग्रस्तांच्या घरात घुसखोर

प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी या भागात बांधलेल्या सुमारे ३००च्या आसपास सदनिकांमध्ये घुसखोर घुसले आहेत. घुसखोरांना मदत करणाऱ्या दलालांचा येथे सुळसुळाट झाला आहे. मात्र घुसखोर आणि दलालांविरुद्ध अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही.

कचरा वेचकांची व्यथा

देवनार कचराभूमीत येणारा कचरा वेचून त्यावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या कचरा वेचकांची संख्या मोठी आहे. कचराभूमीच्या आसपासच्या वस्त्यांमध्ये वास्तव्य करणाऱ्या कचरा वेचकांचे आरोग्य सतत कचऱ्याच्या सान्निध्यात राहिल्यामुळे धोक्यात आले आहे. विविध व्याधींनी ते त्रस्त झाले आहेत. मोठी आग लागल्यानंतर कचराभूमीमध्ये प्रवेश मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे कचरा वेचकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

गावठाणांचा प्रश्न

ट्रॉम्बे परिसरात कोळीवाडे आणि गावठाणे आहेत. मात्र कोळीवाडे, गावठाणांच्या विकासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथील अनेकांची घरे मोडकळीस आली आहेत. त्यामुळे घरांची पुनर्बाधणी करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी सातत्याने येथील रहिवाशांकडून करण्यात येत आहे. परवानगी मिळत नसल्याने धोकादायक घरात राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

प्रदूषणाचे आगर

कचराभूमीतील दरुगधी, वाहतूक कोंडी, वाहनांचा धूर आणि सतत उडणारी धूळ यामुळे या परिसरात मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण होत आहे. आसपासच्या परिसरात असलेले आरसीएफ, बीपीसीएल या रासायनिक कंपन्यांमुळे या परिसरातील प्रदूषणात मोठय़ा प्रमाणावर भर पडत आहे. त्याचे दुष्परिणाम येथील रहिवाशांना भोगावे लागत आहेत.

मिठागरांचा विकास ऐरणीवर

ट्रॉम्बे परिसरात मोठय़ा प्रमाणावर मिठागरे आहेत. काही ठिकाणी सांडपाण्याचा शिरकाव झाल्याने मिठागरांची वाट लागली आहे, तर काही मालकांना या जमिनींचा विकास करावयाचा आहे. मात्र परवानगी मिळत नसल्याने त्या ठिकाणच्या विकासाला खीळ बसली आहे.

नाल्यांची दुर्दशा

या परिसरात अनेक नाले असून त्यांची साफसफाई योग्य पद्धतीने होत नाही. पावसाळा जवळ आला की वरवरचा कचरा काढण्यात येतो. त्यामुळे कचरा साचून नाल्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यात नाले तुंबून आसपासचा परिसर जलमय होऊन रहिवाशांना फटका बसत आहे.

कचऱ्याचे डोंगर

या भागातील सर्वात मोठी समस्या म्हणजे देवनार कचराभूमी. क्षमता संपुष्टात आल्यानंतरही दररोज या कचराभूमीत कचरा टाकला जात आहे. कचराभूमीत कचऱ्याचे मोठमोठे डोंगर उभे राहिले आहेत. कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येत नसल्याने परिसरात दरुगधीचे साम्राज्य पसरते. अधूनमधून कचराभूमीत लागणाऱ्या आगींमुळे गंभीर परिस्थिती निर्माण होते. रहिवाशांना धुराचा त्रास सहन करावा लागतो, तर काही दिवसांपूर्वी येथील शाळा बंद ठेवाव्या लागल्या होत्या. कचराभूमीत अलिकडेच लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला काही दिवस लागले होते.

न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही देवनार कचराभूमीतील परिस्थिती बदललेली नाही. कचराभूमी आता प्रतिबंधित करण्यात आली असून आतमध्ये कोणालाच सोडण्यात येत नाही. त्यामुळे कचरा वेचकांना रोजगाराला मुकावे लागले आहे. वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने तेथे प्रकल्प उभारला आहे. पण या प्रकल्पात निकषांचे पालन करण्यात आलेले नाही. त्यामुळे या प्रकल्पातून मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण होत आहे. 

– राजकुमार शर्मा, सामाजिक कार्यकर्ता