भाजपची शिवसेनेविरोधात रणनीती

मुंबई: मुंबई महापालिकेतील शिवसेनेची सत्ता २०२२ मधील निवडणुकीत हिसकावून घेऊन भाजपचा महापौर निवडून आणण्याचे लक्ष्य पक्षाने निश्चित केले आहे. आता विरोधी पक्षनेतेपदावर भाजप दावा करणार असून महापालिकेतील भ्रष्टाचार खणून काढणार असल्याचे प्रवक्ते राम कदम यांनी सांगितले. मुंबईतील भाजप नेत्यांकडून आता रस्त्यावर उतरून भ्रष्टाचाराविरोधात आंदोलने सुरू करण्यात येणार आहेत.

राज्यातील सत्तास्थापनेवरून भाजप-शिवसेनेमध्ये बिनसल्यानंतर भाजपने आता शिवसेनेविरोधात रणनीती आखली आहे. मुंबई महापालिका ही शिवसेनेची मोठी ताकद असून तेथील सत्ता आगामी निवडणुकीत स्वबळावर काबीज करण्याचे ध्येय आता भाजपने ठरविले आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आदींच्या उपस्थितीत मुंबई भाजप कार्यालयात मंगळवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपची रणनीती ठरविण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.

गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपचे बहुमत थोडक्यात हुकले. त्या वेळी राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार होते. त्यामुळे भाजपने शिवसेनेला पाठिंबा दिला होता. युतीत बिघाडी निर्माण झाल्यानंतर आता विरोधी पक्षनेतेपदावर भाजप दावा करणार आहे. भाजपचे ८३ नगरसेवक असल्याने आम्ही विरोधी पक्षनेतेपद मिळविणार असल्याचे कदम यांनी सांगितले. हे पद सध्या काँग्रेसकडे आहे. गेल्या महापालिका निवडणुकीच्या वेळीही भाजप-शिवसेनेत जुंपली होती.