News Flash

प्रसूतिगृहाच्या जागी कौशल्य प्रशिक्षण केंद्र

प्रसूती विभाग सुरू करण्यासाठी एका नामांकित रुग्णालयाला हे प्रसूतिगृह हवे होते

माहीम प्रसूतिगृहातील तळमजल्यावरील जागा ‘स्किल्ड लॅब ट्रेनिंग सेंटर’(कौशल्य प्रशिक्षण केंद्र) साठी देण्याचा घाट पालिकेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घातला आहे

माहिममधील प्रसूतिगृहाबाबत पालिकेचा निर्णय; गर्भवतींची परवड होण्याची शक्यता

माहीम प्रसूतिगृहातील तळमजल्यावरील जागा ‘स्किल्ड लॅब ट्रेनिंग सेंटर’(कौशल्य प्रशिक्षण केंद्र) साठी देण्याचा घाट पालिकेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घातला आहे. त्याचा फटका रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांनाच नव्हे तर प्रसूतिगृहातील काही सेवांनाही बसणार आहे.

१९७० साली हे प्रसूतिगृह उभारले गेले. आज येथे नवीन गर्भार माता नोंदणी, प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात आरोग्य सेवा, बालरुग्ण, बाह्य़रुग्ण सेवा, बालकांचे लसीकरण आदी विविध सेवा दिल्या जातात. माटुंगा, माहीम, धारावी आणि आसपासच्या वस्त्यांमधील महिला आणि बालके येथे मोठय़ा संख्येने उपचारासाठी येत असतात. या प्रसूतिगृहात दर महिन्याला सुमारे ५० शस्त्रक्रिया केल्या जातात, तर सुमारे ७५ नवजात बालके जन्म घेतात. येथे दर महिन्याला सुमारे दीड हजार महिला आणि बालके वैद्यकीय सेवेचा लाभ घेण्यासाठी येत असतात. तपासणीसाठी येणाऱ्या गर्भवती महिला आणि लसीकरणासाठी आणण्यात येणाऱ्या तान्ह्य़ा बाळांसोबत येणाऱ्या नातेवाईकांना प्रसूतिगृहाच्या तळमजल्यावरील मोकळ्या जागेत थांबावे लागते. येथे प्रयोगशाळा, माताबाल संगोपन आणि कुटुंब कल्याण विभागाचे आरोग्य केंद्र आहे.

आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या महिला आणि बालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रसूतिगृहालाच जागा अपुरी पडू लागली आहे. असे असताना आता प्रशासनातील काही परिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रसूतिगृहाच्या तळमजल्यावर ‘स्किल्ड लॅब ट्रेनिंग सेंटर’ सुरू करण्याचा घाट घातला आहे. त्यासाठी तळमजल्यावरील प्रयोगशाळा आणि आरोग्य केंद्र शौचालयाच्या शेजारी हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तळमजल्यावरील जागेत केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची कुणकुण प्रसूतिगृहातील कर्मचाऱ्यांना लागल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. केंद्रामुळे तळमजल्यावरील जागाही जाणार. मग या सर्वानी क्रमांक येईपर्यंत रस्त्यावर उभे राहायचे का? असा सवाल प्रसूतिगृहातील कर्मचाऱ्याने सांगितले.

प्रसूती विभाग सुरू करण्यासाठी एका नामांकित रुग्णालयाला हे प्रसूतिगृह हवे होते; परंतु राजकीय पक्षांनी प्रसूतिगृह त्या रुग्णालयाला देण्याचा डाव उधळून लावला होता. आता स्किल्ड लॅबच्या निमित्ताने प्रसूतिगृहात घुसखोरी करण्याचा घाट पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच घातल्याची चर्चा प्रसूतिगृहात सुरू आहे.

स्किल्ड लॅब ट्रेनिंग सेंटरमध्ये परिचारिका, वैद्यकीय अधिकाऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशिक्षणासाठी येणारे डॉक्टर आणि परिचारिकांची प्रसूतिगृहातील गर्दीत भर पडणार आहे. वैद्यकीय तपासणीसाठी येणाऱ्यांचा प्रशिक्षणासाठी येणारे डॉक्टर आणि परिचारिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे ही गैरसोय टाळण्यासाठी प्रसूतिगृहात स्किल्ड लॅब ट्रेनिंग सेंटर उभारू नये अशी मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणात लक्ष घालून प्रसूतिगृहात होणारी गैरसोय टाळावी, असे साकडे येथील कर्मचाऱ्यांनी पालिका आयुक्तांना घातले आहे.

प्रसूतीपूर्व, प्रसूती आणि प्रसूतीनंतर; तसेच नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी याचे मॉडेल्सवर प्रात्याक्षिकासह प्रशिक्षण या केंद्रात देण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक ती यंत्रणा उभारण्यात येणार आहे. एका तुकडीमध्ये ३० जणांना प्रशिक्षण देण्यात येणार असून प्रशिक्षणार्थीमुळे गरोदर महिला, बाळांना कोणताही त्रास होण्याची शक्यताच नाही. मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे माहीम प्रसूतिगृहाची स्किल्ड लॅबसाठी निवड करण्यात आली आहे. स्किल्ड लॅबसाठी तळमजल्यावरील केवळ १५०० ते १८०० चौरस फूट जागेचा वापर करण्यात येणार आहे. प्रसूतिगृहाची जागा कमी होणार नाही. स्किल्ड लॅबचा या प्रसूतिगृहासाठी फायदाच होणार आहे.

– डॉ. मंगला गोमारे, उपकार्यकारी आरोग्य अधिकारी पालिका परिमंडळ – ५

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 4:16 am

Web Title: bmc maternity homes in mahim skilled lab training center
Next Stories
1 प्रतिकूल परिस्थितीत हत्या खटल्यातील आरोपीला जन्मठेप
2 गॅलऱ्यांचा फेरा : नेपाळमधून, नेपाळबद्दल..
3 भाजपची स्वबळाची तयारी सुरू
Just Now!
X