मुंबई : करोना विषाणुशी दोन हात करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या गौरवात मुंबईकरांनी दिवे उजळवण्यात किं वा टाळ्या-थाळ्या वाजवण्यात जो उत्साह दाखवला त्याच्या नेमका उलट अनुभव करोनाबाधितांच्या शोधात गल्लीबोळ्यात फिरणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना येतो आहे. मग ही घरे उच्चभ्रू वस्तीतील आलिशान टॉवर असो वा दाटीवाटीने उभ्या असलेल्या झोपडपट्टय़ांमधील..

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे कर्मचारी काम करीत आहोत. करोनाबाधितांच्या शोध मोहिमेमुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्याची तमा न बाळगता ही मंडळी काम करीत आहोत. पण कित्येकदा तपासणीदरम्यान एखाद्या इमारतीत करोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर आजुबाजूच्या इमारतींमध्ये या कर्मचाऱ्यांना प्रवेश नाकारण्यात येतो. करोनाबाधित वा संशयीत सापडल्यानंतर आरोग्यविषयक आणि त्याअनुषंगाने त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींची माहिती मिळवावी लागते. पण वाहनचालक, घरकाम करणारी महिला वा पुरुष, कार्यालयांतील सहकारी, मित्र परिवार आदींची चौकशी करण्यास सुरुवात केल्यानंतर संबंधित मंडळी सहकार्य करत नाहीत.

काही माहिती दडवतात आणि त्यामुळे संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे काम करणारे कर्मचारी सांगतात.

अंधेरीच्या लोखंडावाला परिसरातील एका इमारतीत तपासणी सुरू होती. एका घरात १२-१३ जण निवांतपणे गप्पा मारत बसले होते. मार्चच्या दुसऱ्या आठवडय़ात पाकिस्तानातून आलेल्या एका दाम्पत्याचाही त्यात समावेश होता. दाम्पत्य पाकिस्तानातून आल्याचे समजताच तात्काळ त्यांची तपासणी केली आणि या दोघांमध्ये करोनाची लक्षणे आढळून आली. मग या दोघांना जोगेश्वरीच्या ट्रॉमा रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला आणि अन्य सदस्यांची तपासणी सुरू केली. पण मंडळी चाचणीसाठी तयारच होत नव्हती. मिन्नतवाऱ्या केल्यानंतर त्यांनी तपासणी करुन घेण्याची तयारी दर्शविली.  मात्र विलगीकरणात जाण्यास ते तयार नव्हते. सुदैवाने इतरांच्या चाचणीचा अहवाला नकारात्मक आला आणि मोठा धोका टळला, असा अनुभव अंधेरी परिसरात घरोघरी फिरुन नागरिकांची करोनाविषयक तपासणी करणाऱ्या पालिकेच्या आरोग्य खात्यातील कर्मचारी विलास गोरेगावकर (नाव बदलले आहे) यांनी सांगितला.

नागरिक वऱ्हाडासारखे फिरतात..

काही इमारतींमध्ये अतिउत्साही रहिवाशी सापडतात. घराघरात तपासणी सुरू असताना ही मंडळी आमच्या पथकासोबत वऱ्हाडासारखे फिरतात. सोबत येऊ नका असे सांगूनही ते ऐकत नाही. इतकेच नव्हे तर सर्व रहिवाशांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर ते आम्हाला सोडायला रस्त्यापर्यंत सोडायला येतात. संसर्गाचा धोका वाढत असतानाही नागरिक रस्त्यावर येण्याची संधी सोडत नाहीत, अशी माहिती एका कर्मचाऱ्याने  दिली.