मेट्रोची कामे सुरू असलेल्या रस्त्याची जबाबदारी कुणाची?; पालिका, एमएमआरडीएचे एकमेकांकडे बोट

मालाड येथे लिंक रोडवरच्या खड्डय़ांचा मुद्दा आता आणखी गंभीर होऊ लागला असून या रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी आपली नसल्याचे सांगत महापालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) एकमेकांकडे बोट दाखवले आहे. मेट्रोच्या कामासाठी रस्ता एमएमआरडीएकडे दिल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. तर, मेट्रोची कामे सुरू असलेल्या रस्त्याच्या भागाची जबाबदारी आमची असल्याचा प्राधिकरणाचा दावा आहे. बांधकामाचे स्थळ (वर्कसाइट) या शब्दाचा दोन्ही संस्थांनी आपापल्या परीने सोयीस्कर अर्थ लावत असून त्यांच्या वादात रस्त्याची दुर्दशा कायम आहे.

मुंबईत सध्या मेट्रोसह अन्य विकास प्रकल्पांच्या कामांसाठी कुलाब्यापासून दहिसपर्यंतच्या रस्त्यांवर प्रचंड खड्डे खणले गेले आहेत. या कामांमुळे अरुंद झालेले रस्ते आणि त्यावर पडलेले खड्डे यांतून वाट काढत उद्याच्या ‘उज्ज्वल भविष्याकडे’ डोळे लावून मुंबईकरांचा सध्याचा प्रवास सुरू आहे. मात्र, एकही यंत्रणा या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची जबाबदारी घेण्याच्या मन:स्थितीत नाही. या कामाची जबाबदारी परस्परांवर ढकलून या दोन्ही यंत्रणांनी हात वर केले आहेत.

पालिकेने दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनला २९ ऑगस्ट २०१६ मध्ये लिहिलेल्या पत्रात दहिसर पूर्व ते लिंक रोडपर्यंत मेट्रोच्या बांधकामाची जागा वाहतुकीसाठी योग्य स्थितीत ठेवण्याचे तसेच रस्त्याचा खराब झालेला भाग महापालिकेच्या नियमांनुसार पूर्ववत करण्याचे नमूद केले आहे. त्याचप्रमाणे बांधकाम (वर्कसाइट) जागेवरील खड्डे, चर, खरवडलेले भाग नीट करण्याचीही सूचना केली आहे. हा ‘वर्कसाइट’ शब्दच दोन्ही यंत्रणांतील मतभेदांचे कारण आहे. महापालिकेच्या मते, मेट्रोची ‘वर्कसाइट’ असलेला संपूर्ण रस्ता एमएमआरडीएची जबाबदारी आहे. तर मेट्रोसाठी खोदकाम केलेला भाग आणि प्रत्यक्ष प्रकल्पाची जागा असलेल्या रस्त्याची जबाबदारी आमची आहे, असे एमएमआरडीएचे म्हणणे आहे. या दोन्ही यंत्रणांच्या वादात रस्त्यांची मात्र दुर्दशा होत चालली आहे.  त्यामुळे सध्याच्या पावसाळय़ातही मुंबईकरांचा प्रवास अडचणीचा ठरणार आहे.

मेट्रोच्या कामासाठी आम्ही नऊ  मीटरचा रस्ता ताब्यात घेतला आहे. बॅरिकेड्स लावून हा भाग इतर रस्त्याहून वेगळा करण्यात आला आहे. मेट्रोचे काम पूर्ण झाले की बॅरिकेडमधील भाग पूर्ववत करून देण्याची जबाबदारी आमची राहील. मात्र रस्त्याच्या इतर भागातून वाहतूक सुरू असून त्याची देखभाल करणे आमच्या कामात अंतर्भूत नाही.

– पी. के. शर्मा, (प्रकल्प संचालक, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन.)

पूर्व व पश्चिम द्रुतगती मार्ग एमएमआरडीएकडे हस्तांतरित करण्यात आलेले आहेत. हे रस्ते वाहतुकीसाठी योग्य ठेवण्याची जबाबदारी एमएमआरडीएची आहे व खड्डे भरण्यासाठी कंत्राटदारांचीही नेमणूक करण्यात आली आहे. शहरातील इतर कोणत्याही रस्त्याची जबाबदारी एमएमआरडीएकडे नाही.

दिलीप कवठकर, एमएमआरडीए

‘डीएमआरसी’ला परवानगी पत्र देताना या ठिकाणच्या रस्त्याची जबाबदारीही दिली आहे. मेट्रोचे काम करताना संपूर्ण रस्त्यावरून यंत्रे आणली जातात, रस्ता एका ठिकाणी खोदला तरी संपूर्ण रस्त्याचे बांधकाम (स्ट्रक्चर) बिघडते. मग फक्त खोदकामापुरता रस्ता नीट करण्यात काय अर्थ आहे? यापूर्वी मेट्रोच्या कामामुळे अंधेरी-घाटकोपरचा संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला होता. मात्र ती जबाबदारीही पालिकेवरच आली.

–  एक पालिका अधिकारी