माफियांकडून मिळालेल्या पैशांमधून शिवसेनेने नगरसेवकांची खरेदी केल्याचा गंभीर आरोप भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी सोमय्यांनी केली आहे.

भांडुपमधील पोटनिवडणुकीतील विजयामुळे मुंबई महापालिकेतील सत्तेचा काटा भाजपकडे झुकत असताना शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) सात पैकी सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. फोडाफोडीच्या राजकारणामुळे मनसेची वाताहत झाली असतानाच भाजपचे सत्तास्थापनेचे स्वप्न भंगले. या पार्श्वभूमीवर भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना शिवसेनेवर हल्लाबोल केला. माफियांकडून मिळालेल्या पैशांमधून शिवसेनेने नगरसेवकांची खरेदी केल्याचा आरोप त्यांनी केला. पोटनिवडणुकीतील भाजपचा विजय शिवसेनेच्या जिव्हारी लागल्याची टीका त्यांनी केली आहे.

फेब्रुवारीमध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला ८४ तर भाजपला ८२ जागा मिळाल्या. सेनेला चार अपक्षांचा पाठिंबा असून भाजपला एक अपक्ष आणि अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी यांचा पाठिंबा आहे. भांडुप पोटनिवडणुकीतील विजयाने भाजपचे संख्याबळ एकने वाढले. त्यामुळे सेनेच्या गोटात अस्वस्थता होती. शेवटी मनसेच्या सहा नगरसेवकांना पक्षात प्रवेश देण्याची खेळी सेनेने खेळली. या नगरसेवकांना कोकण विभागीय आयुक्तांकडून मान्यता मिळाल्यास सेनेचे संख्याबळ ९४ वर पोहोचणार आहे.

किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी या प्रकरणावर ट्विट केले आणि महापालिकेत राजकीय नाट्य उलगडण्यास सुरुवात झाली. पालिकेतील एका मोठ्या पक्षाकडून नगरसेवकांना विकत घेण्याचा प्रयत्न सुरू असून यासाठी या नगरसेवकांना कोट्यवधी रूपयांच्या ऑफर्स दिल्या जात आहेत, असा दावा सोमय्या यांनी केला होता. दरम्यान, शनिवारी सकाळी राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर मनसैनिकांची गर्दी झाल्याचे समजते. संतप्त मनसैनिकांनी उद्धव ठाकरेंविरोधात घोषणाबाजीही केल्याचे वृत्त आहे.