केंद्राकडून पुरवठा खंडित होण्याची शक्यता

शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई : केंद्र सरकारकडून होणारा आरटीपीसीआर चाचणी संचचा पुरवठा बंद होण्याची शक्यता असल्याने आता याच्या खरेदीची प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे. तसेच आणखी एक लाख प्रतिजन चाचणी संच पालिकेकडून खरेदी करण्यात येणार आहेत.

पालिकेंतर्गत असलेल्या चार प्रयोगशाळांसाठी आरटीपीसीआर संच आतापर्यंत केंद्राकडून पुरविले जात होते. परंतु सप्टेंबरपासून हा पुरवठा खंडित करण्याचे संकेत केंद्राने दिले आहेत. त्यामुळे आता राज्य सरकारसह पालिकेनेही या संचाच्या खरेदीसाठी निविदा तयार केल्या आहेत.

पालिकेने मागील चार दिवसांपासून चाचण्यांची संख्या गेल्या महिन्याच्या तुलनेत सात हजारांवरून थेट १० हजारांवर नेली आहे. महिनाभरात ही क्षमता १३-१४ हजारांपर्यंत नेण्याचेही पालिकेने जाहीर केले आहे. शहरातील एकूण चाचण्यांपैकी ८५ टक्के  चाचण्या आरटीपीसीआर असून उर्वरित १५ टक्के  प्रतिजन आहेत. पालिकेच्या प्रयोगशाळांमध्ये दिवसाला दीड ते दोन हजार संचाची आवश्यकता भासते. क्षमता वाढविली तरी अडीच हजारांपर्यंत संच लागू शकतात. त्यानुसार एक लाख संच खरेदी केले तरी तीन महिन्यांपर्यंत पुरेसे असल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

सध्या पालिकेकडे ३० सप्टेंबपर्यंत पुरेल इतका साठा उपलब्ध आहे. आरटीपीसीआर चाचण्यांची बाजारातील किमती, उत्पादक यांची माहिती घेऊन निविदा तयार केल्या आहेत. केंद्राकडून अजून तरी पूर्णत: बंद केल्याच्या सूचना मिळालेल्या नाहीत. आम्ही पुरवठा आणखी काही काळ सुरू ठेवण्याची मागणी केंद्राकडे केली आहे. त्यांच्या प्रतिसादानुसार या महिन्यात निविदा जाहीर करून पहिल्या टप्प्यात ५० हजार संचांची खरेदी केली जाईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

आतापर्यंत एक लाखांहून अधिक प्रतिजन चाचण्या

पालिकेचा प्रतिजन चाचण्यावरील भर वाढल्याने चाचण्यांच्या संचाची मागणीही वाढत आहे. सुरुवातीला पालिकेने एक लाख संच घेतले होते. हे आता संपले असून आणखी मागविलेल्या एक लाख संचापैकी ५० हजार पालिकेला प्राप्त झाले आहेत, तर उर्वरित ५० हजार येत्या काही दिवसांत मिळणार आहेत. आतापर्यंत दोन लाख प्रतिजन चाचण्यांचे संच पालिकेने मागविले होते. आता आणखी एक लाख संच पालिका मागविणार असल्याची माहिती काकाणी यांनी दिली.