News Flash

करोना केंद्रातील साहित्य धूळखात

महापालिकेचे तीन महिन्यांपासून निसर्ग उद्यानातील केंद्राकडे दुर्लक्ष; पुठ्ठय़ांच्या खाटांचा लगदा

निसर्ग उद्यानातील करोना केंद्र बंद केले असले तरी तेथील सामान अद्याप हटवले नसून ते अस्ताव्यस्त पडले आहे.

महापालिकेचे तीन महिन्यांपासून निसर्ग उद्यानातील केंद्राकडे दुर्लक्ष; पुठ्ठय़ांच्या खाटांचा लगदा

सुहास जोशी, लोकसत्ता 

मुंबई : धारावीतील ‘महाराष्ट्र निसर्ग उद्याना’त पालिकेने उभारलेले करोना केंद्र बंद होऊन तीन महिने झाले तरी केंद्रासाठी लाखोंचा खर्च करून विकत आणलेल्या पुठ्ठय़ांच्या खाटा, गाद्या, उशा, चादरी, फिरती शौचालये-स्नानगृहे आदी साहित्य धूळखात पडून आहे. येथील पुठ्ठय़ांच्या खाटा तर पावसाच्या पाण्याच्या माऱ्याने लगदा होण्याच्या मार्गावर आहेत.

धारावीत मिठी नदीच्या किनारी असलेल्या प्रशस्त अशा महाराष्ट्र निसर्ग उद्यानातील खुला रंगमंच व अन्य रिकाम्या जागेत जूनच्या सुरुवातीस पालिकेने करोना आरोग्य केंद्र उभारले. येथे सुमारे २०० रुग्णांसाठी सुविधा केली होती. सध्या केंद्र बंद झाले असले तरी केंद्रासाठी आणण्यात आलेल्या पुठय़ाच्या खाटा, नॉयलॉनच्या पट्टय़ा असलेल्या घडीच्या खाटा, गाद्या, उशा, ५५ स्नानगृह-शौचालये आणि इतर सामग्री अद्याप याच ठिकाणी पडून आहे.

एका बाजूने खुल्या असणाऱ्या खुल्या रंगमंचाच्या जागेत आणि तीन बाजूने बंदिस्त कार्यशाळेच्या ठिकाणी ही सामग्री ठेवली आहे. या तिन्ही ठिकाणी एका खुल्या बाजूस जुजबी कापडी पडदा लावला आहे. परिणामी पावसाने खुल्या रंगमंचाच्या ठिकाणी असलेल्या पुठ्ठय़ांच्या काही खाटांचा लगदा होणाच्या मार्गावर आहे. तर काही सामानास गोणपाटाने झाकले आहे. अन्य ठिकाणचे सामान मात्र अस्ताव्यस्त पडले आहे. केंद्र सुरू झाल्यानंतर डासांचा त्रास आणि सापांच्या भीतीमुळे येथे रुग्ण राहायला तयार नव्हते. महाराष्ट्र निसर्ग उद्यान हे एक छोटेसे समृद्ध असे जंगलच आहे. त्यामुळे मुळातच येथे करोना केंद्र उभारणे अयोग्य असल्याचे सूत्रांनी सांगितले.

खाटा अस्ताव्यस्त

वजनाने हलक्या आणि स्वस्त म्हणून करोना के ंद्रांमध्ये आणण्यात आलेल्या पुठ्ठय़ांच्या खाटांचे सुरुवातीच्या दिवसात चांगलेच कौतुक झाले. पण निसर्ग उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळील वऱ्हांडय़ात या खाटा अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत. पावसामुळे यातील काही खाटांचा लगदा होण्याच्या मार्गावर आहे. येथील खाटांना प्राणवायूची सुविधाही होती. त्या महागडय़ा वैद्यकीय सामग्रीचे काय झाले, हे गुलदस्त्यातच आहे.

धारावी परिसरातील रुग्णांची संख्या कमी झाल्याने हे केंद्र पालिकेने बंद केले. येथील पुनर्वापर करता येण्यासारखे सामान हटवले जाईल आणि त्याचा योग्य जागी वापर केला जाईल.

– किरण दिघावकर, साहाय्यक आयुक्त, ‘जी उत्तर’ विभाग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2020 1:43 am

Web Title: bmc neglecting covid care center at nature park for three months zws 70
Next Stories
1 मोठय़ा करोना केंद्रांना खासगी तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन
2 आरटीपीसीआर चाचणी संच खरेदीसाठी पालिकेच्या हालचाली
3 ग्रँट रोडमधील बाधित रुग्णांमुळे वांद्रे-कुर्ला संकुलात संसर्गभीती
Just Now!
X