पालिका पुरातन वारसा वास्तू समितीकडे प्रस्ताव सादर करणार

नवख्या व्यक्तींसाठी चक्रव्यूह ठरणारी, विदेशी पर्यटकांचे आकर्षण बनलेली आणि सिमेंटच्या जंगलामध्ये पुरातन वास्तूचा वारसा मिरविणारी गिरगावमधील खोताची वाडी लवकरच कात टाकण्याच्या तयारीत आहे. खोताच्या वाडीतील टुमदार बंगले, छोटय़ा चाळी, आडवळणाच्या गल्ल्या पुरातन वास्तूप्रमाणे दिसाव्यात यादृष्टीने काही फेरबदल करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून पालिका आयुक्तांनी या प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. स्थानिक नगरसेविकेच्या पुढाकाराने हाती घेण्यात येत असलेल्या या प्रकल्पासाठी पुरातत्त्व विभागाच्या मंजुरीची आवश्यकता असून लवकरच त्याबाबतचा प्रस्ताव पुरातत्त्व विभागाकडे सादर करण्यात येणार आहे.

एकेकाळी मुंबईवर पोर्तुगिजांचे आधिपत्य होते. कालांतराने पोर्तुगिजांनी मुंबई इंग्लंडच्या युवराजाला आंदण म्हणून दिली आणि मुंबईवर ब्रिटिश हुकूमत आली. दरम्यानच्या काळात समुद्रकिनारी काही टुमदार बंगले उभे केले. हळूहळू या बंगल्यांच्या आसपास चाळी, इमारती उभ्या राहिल्या. त्या काळी या वसाहतीमधून कर वसूल करण्याची जबाबदारी ब्रिटिशांनी दादोबा वसंत खोत यांच्यावर सोपविली होती. भारतातून निघून जाण्यापूर्वी ब्रिटिशांनी ही वसाहत दादोबा वसंत खोत यांच्या ताब्यात दिली. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात ही वस्ती खोताची वाडी म्हणून ओळखली जाऊ लागली. त्या काळी खोताच्या वाडीमध्ये तब्बल ६५ बंगले होते. मात्र मुंबईमध्ये विकासाचे वारे वाहू लागले आणि ३९ बंगले काळाच्या पडद्याआड गेले. आजघडीला सुमारे २६ बंगले आपले अस्तित्व टिकवून आहेत. त्यामुळेच खोताच्या वाडीला पुरातन वारसा वास्तूचा दर्जा प्राप्त झाला आहे. पोर्तुगीज बांधकामाची साक्ष असलेले हे बंगले, चर्च पाहण्यासाठी मोठय़ा संख्येने पर्यटक खोताच्या वाडीत येत असतात. ही बाब लक्षात घेऊन स्थानिक नगरसेविका अनुराधा पोतदार यांनी खोताच्या वाडीत पुरातन वास्तूचे दर्शन घडावे यादृष्टीने काही महत्त्वाचे फेरबदल करण्याचा प्रस्ताव पालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांसमोर मांडला. तसेच खोताच्या वाडीचे रूपडे बदलण्यासाठी लागणारा निधी आपल्या नगरसेवक निधीतून देण्याची तयारी अनुराधा पोतदार यांनी दर्शविली आहे. या प्रकल्पामध्ये स्थानिक रहिवासी आणि खोताची वाडी वेल्फेअर अ‍ॅण्ड हेरिटेज ट्रस्टलाही सहभागी करण्याचा पालिकेचा मानस आहे. रहिवासी आणि ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांबरोबर पालिका अधिकाऱ्यांनी चर्चा केली असून त्यांनीही या प्रकल्पास सहमती दर्शविली आहे.

‘डी’ विभाग कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांना खोताच्या वाडीला पुरातन वास्तूप्रमाणे नवे रूप देण्याची कल्पना पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे मांडली. अजोय मेहता यांनी तत्काळ या प्रकल्पाला तत्त्वत: मंजुरी दिली. पूर्वी खोताच्या वाडीतला रस्ता दगडी होता. मधल्या काळात डांबरीकरण आणि नंतर तेथे पेवर ब्लॉक बसविण्यात आले. आता पुरातन वारसा वास्तू दिसावी यादृष्टीने खोताच्या वाडीतील रस्त्यांची बांधणी करण्यात येणार असून वाडीच्या सौंदर्यात भर घालतील असे पथ दिवे, रोड साइन, स्ट्रीट फर्निचर आदी बसविण्यात येणार आहेत. याचबरोबर खोताच्या वाडीत कचरा अस्ताव्यस्त पडू नये यासाठी विशेष काळजी घेण्यात येणार असून त्यासाठी खोताच्या वाडीत काही जागा निश्चित करून तेथे कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. पावसाचे पाणी साचू नये, ते विनाअडथळा वाहून जावे यासाठी विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. तसेच वर्षां जलसंचयन प्रकल्पाचाही विचार करण्यात येणार आहे.

एकूणच खोताची वाडी पुरातन वास्तू वाटावी असे काही फेरबदल करण्यात येणार आहेत. मात्र हे फेरबदल करण्यासाठी पुरातन वारसा वास्तू समितीच्या परवानगीची आवश्यकता आहे. त्यामुळे पालिकेने या प्रकल्पाची आखणी करून त्याबाबतचा प्रस्ताव पुरातन वारसा वास्तू  समितीकडे सादर करण्याची तयारी सुरू केली आहे. या प्रकल्पासाठी नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवून सर्वसंमतीने खोताच्या वाडीला नवे स्वरूप देण्यात येणार आहे.

खोताच्या वाडीचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन आवश्यक ते बदल करण्याचा पालिकेचा मानस आहे. रहिवाशांच्या सहभागातून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.   – विश्वास मोटे, साहाय्यक आयुक्त

गिरगावमधील खोताची वाडी मुंबईतील वैभवांपैकी एक आहे. विदेशी पर्यटनाच्या नकाशावर तिने स्थान मिळविले आहे. त्यामुळे खोताच्या वाडीला तिचे पूर्वीचे वैभवाचे रूप देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.         – अनुराधा पोतदार, भाजप नगरसेविका