एका मृत उंदरामागे १८ रुपये देण्याची तयारी दर्शवूनही कंत्राटदार अनुत्सुक

शहरातील कचऱ्यावर पोसल्या जाणाऱ्या आणि लेप्टोस्पायरोसिस या आजाराच्या प्रादुर्भावाला कारणीभूत ठरणाऱ्या उंदरांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी मुंबई महापालिकेने पावसाळ्यापूर्वी उंदीर मारण्याची मोहीम फत्ते करण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु प्रत्येक मृत उंदरामागे १८ रुपये देण्याची तयारी दर्शवूनही खासगी कंत्राटदारांनी या कामात रस दाखवलेला नाही. या कामासाठी फारशा निविदा न आल्याने आता ज्या संस्था पुढे येतील, त्यांना काम देण्याचा पालिकेचा विचार आहे.

दोन वर्षांपूर्वी, २०१५ मध्ये जून महिन्यात आलेल्या लेप्टोस्पायरोसिसच्या साथीत शहरात १२ जण दगावले होते. गेल्या वर्षी लेप्टोस्पायरोसिसच्या साथीमध्ये सात जण दगावले होते. लेप्टोस्पायरोसिसचे विषाणू गुरे, कुत्रे आणि उंदीर यांच्या मलमूत्राद्वारे पसरतात. त्यामुळे गुरांचे लसीकरण करण्याबरोबरच व कुत्रे आणि उंदरांची संख्या नियंत्रणात आणणे आवश्यक असते. पालिकेकडे केवळ ३० मूषकसंहारक आहेत. त्यांना दर दिवशी ३० उंदीर मारण्याचे उद्दिष्ट दिले जाते. मात्र तरीही संपूर्ण मुंबई शहरातील उंदरांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी हा उपाय तोकडा पडतो. त्यामुळे गेल्या वर्षी पावसाळ्यात मूषकसंहार करण्यासाठी खासगी कंत्राटदार नेमण्याचा विचार झाला. त्यासाठी प्रत्येक उंदरामागे दहा रुपये दर ठरवला गेला. मात्र तीन वेळा निविदा काढूनही संस्थांनी या कामासाठी प्रतिसाद दिला नाही. अखेर डिसेंबरमध्ये प्रत्येक मूषकामागे १० ऐवजी १८ रुपये देण्याचे ठरले.

एक मूषक मारण्यासाठी १० ऐवजी १८ रुपये देण्याची तयारी पालिकेने दाखवल्यावरही हे काम करण्यासाठी फारशा संस्था पुढे आलेल्या नाहीत. त्यामुळे ज्यांनी कुणी प्रतिसाद दिला असेल त्या  निविदाकारालाही काम देण्याचा विचार पालिका करत आहे. यामुळे किमान या पावसाळ्यापूर्वी तरी मूषकसंहाराच्या कामात गती येईल अशी अपेक्षा आहे. प्रत्येक मूषक संस्थेला त्यांच्या विभागातील किमान १०० ते १५० उंदीर मारण्याचे उद्दिष्ट देण्यात येईल.

पारदर्शकतेमुळे कंत्राटदारांची पाठ

रस्ते, नालेसफाईसारख्या इतर विभागांच्या कामांमध्ये कंत्राटदार पालिकेने ठरविलेल्या रकमेपेक्षा ३० ते ४० टक्के कमी किमत लावतात. कारण यात ‘कामाची रंगसफेदी’ करता येणे शक्य नसते. परंतु, या कामात मेलेल्या उंदरांच्या संख्येनुसारच पैसे मिळणार असल्याने कंत्राटदारांना कामाची रंगसफेदी करता येणे शक्य नाही. परिणामी फारशा संस्था हे काम करण्यास उत्सुक नसतात. २४ विभागांत प्रत्येकी किमान तीन निविदाकारांना या कंत्राटात रस दाखवायला हवा होता. मात्र फार कुणी पुढे न आल्याने अखेर डिसेंबरमध्ये प्रत्येक उंदरामागील शुल्क पालिकेने वाढवून दिले. परंतु, त्यालाही आता प्रतिसाद मिळेनासा झाला आहे.

सध्या पाच विभागांत संस्थांनी काम सुरू  केले आहे. परंतु, आणखी १९ विभागांसाठी संस्थांची नेमणूक करण्याचे काम सुरू आहे. ज्या विभागांसाठी एकाच संस्थेने प्रतिसाद दिला आहे, त्या संस्थेलाही काम देण्यासंबंधी वरिष्ठ पातळीवर विचार करण्यात येईल व या पावसाळ्याआधी सर्व विभागात मूषकसंहारक नेमण्याचे काम पूर्ण होईल.

राजन नारिंग्रेकर, प्रमुख, कीटकनाशक विभाग