07 March 2021

News Flash

करोनात जीवाची बाजी लावणाऱ्या अध्यापक डॉक्टरांचं निवृत्तीचं वय ६५ करण्यास मुंबई महापालिकेची टाळाटाळ

अस्वस्थ प्राध्यापक - अध्यापक डॉक्टरांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना साकडं

संदीप आचार्य, लोकसत्ता
करोनाच्या गेल्या दहा महिन्यात स्वत:च्या जीवाची बाजी लावणारे मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर प्राध्यापक-अध्यापकांचे निवृत्तीचे वय राज्य शासनाप्रमाणे ६५ करण्यास पालिका प्रशासनाने टाळाटाळ चालवली आहे. यामुळे अस्वस्थ प्राध्यापक – अध्यापक डॉक्टरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे घातले आहे. हे डॉक्टर अध्यापक पुढील वर्षी निवृत्त झाल्यास पालिका वैद्यकीय महाविद्यालयातील पदवीच्या २०० जागा कमी होतील तर पदव्युत्तर व अतिविशेषोपचार अभ्यासक्रमाच्या ४५० जागा कमी होणार आहेत. यातून केवळ खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचेच चांगभले होणार असून पालिकेतील सत्ताधारी शिवसेना बघ्याची भूमिका का घेत आहे? असा सवाल पालिकेच्या डॉक्टरांनी केला आहे.

राज्य शासनाच्या १८ वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापक- प्राध्यापक डॉक्टरांची निवृत्तीची वयोमर्यादा ६५ करण्यात आली. मात्र पालिकेतील डॉक्टरांच्या निवृत्तीचे वय अनेकदा विनंती केल्यानंतर ६२ वरून ६३ म्हणजे अवघे एक वर्षाने वाढविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. या निर्णयावर बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं. मुळात राज्य सरकारच्या वैद्यकीय महाविद्यालयात निवृत्तीचे वय ६५ आहे तर देशातील अनेक राज्यात वैद्यकीय अध्यापकांच्या निवृत्तीचे वय ७० असताना मुंबई महापालिकेला वैद्यकीय अध्यपकांचे वय ६५ करण्यात कोणती अडचण आहे असा सवाल पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर अध्यापकांनी उपस्थित केला आहे.

एकीकडे महापालिका वैद्यकीय महाविद्यालय तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेश क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. यातून शीव रुग्णालयातील एमबीबीएसच्या जागा १५० वरून २०० झाल्या तर नायर रुग्णालयात १२० वरून १५० आणि केईएममध्ये २५० प्रवेश क्षमता झाली. नव्याने सुरु झालेल्या कुपर वैद्यकीय महाविद्यालयात २५० एमबीबीएस विद्यार्थी आहेत. याशिवाय पदव्युत्तर व सुपर स्पेशालिटीच्या दरवर्षी १६२ याप्रमाणे तीन वर्षांत ४५० जागा आहेत. सध्या असलेल्या प्राध्यापकांची निवृत्तीची वयोमर्यादा ६५ न केल्यास पुढील वर्षी ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’च्या निकषानुसार पदवीच्या २०० जागा तर पदव्युत्तर व सुपर स्पेशालिटीच्या ४५० जागा कमी होतील असे एका अधिष्ठात्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. सध्याच्या निवृत्तीच्या वयाचा विचार करता १९ प्राध्यापक व ३५ सहयोगी प्राध्यापक निवृत्त होणार आहेत. याचा मोठा फटका वैद्यकीय विद्यार्थी प्रवेश क्षमतेवर होणार असून यासाठी पालिका वैद्यकीय महाविद्यालयातील अध्यापकांचे निवृत्ती वय राज्य शासनाच्या वैद्यकिय महाविद्यालयाप्रमाणे ६५ करणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

सध्या राखीव जागांचे धोरण तसेच मराठी आरक्षणाचा गुंता यामुळे पालिकेतील रिक्त जागा भरणे अवघड आहे. यासाठी पालिका प्रशासनाने नियमित पदोन्नतीचा प्रस्तावही मंजूर केला असल्याने प्राध्यापकांची निवृत्तीची वयोमर्यादा वाढविल्यास विद्यमान एकाही अध्यापकाचे नुकसान होणार नाही.

यातील महत्वाचा मुद्दा म्हणजे पालिका प्रशासनाने निवृत्तीचे वय ६५ न केल्यास निवृत्त होणाऱ्या प्राध्यापकांना खासगी वैद्यकीय महाविद्यालयात तातडीने नोकरी मिळू शकते. यातून खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील जागांचे प्रमाण वाढेल तर पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी क्षमता कमी होणार आहे. आज पालिकेतील एक प्राध्यापक ३ पदव्युत्तर विद्यार्थी व एक पीएचडीचा विद्यार्थी घेऊ शकतो. वयोमर्यादा न वाढविल्यास ५४ प्राध्यापक- अध्यापक निवृत्त होत असून वर्षाला पदव्युत्तरचे १६२ याप्रमाणे तीन वर्षात ४५० पदव्युत्तर प्रवेशाच्या जागा गमवाव्या लागणार आहेत.

महापालिकेच्या चारही वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर प्राध्यापक- अध्यापकांनी ही वस्तुस्थिती एका पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून निवृत्तीची वयोमर्यादा ६५ करण्याची विनंती केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2021 6:25 pm

Web Title: bmc not ready to lower retired age of teacher doctor sgy 87
Next Stories
1 “दंडेलशाहीने थकबाकी वसूल करणार असाल, तर राज्यात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही”
2 मेट्रोच्या प्रश्नावर अतिशय अक्षम्य दुर्लक्ष, नवीन कमिटीचा निव्वळ फार्स – फडणवीस
3 सोनू सूदला दणका! मुंबई उच्च न्यायालयाने आव्हान देणारी याचिका फेटाळली
Just Now!
X